maharashtra-heavy-rain-red-orange-alert-imd-rain-update-all-districts : चांदा ते बांदा मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत
Mumbai : महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा रौद्ररूप धारण केले असून राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली असून नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी शेतीचे मोठे नुकसान झाले असून रस्ते, पूल आणि वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने पालघर, रायगड, नाशिक आणि पुणे घाटमाथा परिसरासाठी रेड अलर्ट जारी केला आहे, तर ठाणे, मुंबई, रत्नागिरी तसेच काही इतर भागांसाठी ऑरेंज अलर्ट देत नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
राज्यातील बदलत्या हवामान परिस्थितीमुळे प्रशासनही पूर्णपणे सज्ज झाले असून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुढील काही तासांमध्ये काही भागांत ढगफुटीसदृश पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आल्याने नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
Tukaram mundhe : तुकाराम मुंढेंची राज्यातील सर्वात मोठी धडक कारवाई!
कोकण विभागात पावसाचा जोर कायम असून पालघर आणि रायगड जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठाणे, मुंबई आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून पुढील काही तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. किनारपट्टी भागात समुद्र खवळलेला असून मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईत पावसाने काही काळ विश्रांती घेतली असली तरी वातावरण ढगाळ असून पुढील तीन तासांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता कायम असल्याने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मिठी नदी पूर्णपणे भरली असून भरतीच्या पार्श्वभूमीवर सखल भागांवर प्रशासनाचे विशेष लक्ष आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
नाशिक जिल्ह्यात गेल्या अनेक तासांपासून मुसळधार पाऊस सुरू असून त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि परिसरात पावसाचा जोर कायम आहे. हवामान विभागाने नाशिक जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करत पुढील काही तासांत ढगफुटीसदृश पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. प्रशासनाने नागरिकांना नदी-नाल्यांपासून दूर राहण्याचे तसेच अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
Sudhir Mungatiwar: मुनगंटीवारच चॅम्पियन! तगड्या मांडणीसमोर सरकारलाही द्यावे लागले सकारात्मक आश्वासन
इगतपुरी तालुक्यात पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे.
चणकापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मालेगावमधून वाहणाऱ्या गिरणा नदीला पूर आला आहे. नदी दुथडी भरून वाहत असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गिरणा धरणातील पाणीसाठ्यातही वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, मालेगाव शहर आणि परिसरात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने अनेक भागांत खरीप पेरण्या रखडल्या आहेत.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाटण, वाई, जावळी आणि सातारा तालुक्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे डोंगरदऱ्यांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पुणे घाटमाथा परिसरासाठीही रेड अलर्ट जारी करण्यात आला असून भूस्खलन आणि पूरस्थितीचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे.
Devendra fadnavis : विरोधकांच्या मेंदूतून अक्कलच ‘मिसिंग’ मुख्यमंत्री फडणवीसांचे प्रत्युत्तर !
कोल्हापूर जिल्ह्यात सहा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. नदीची पातळी ३५ फुटांवर पोहोचली असून ती आता इशारा पातळीच्या दिशेने वाटचाल करत आहे. नदीपात्राबाहेर पाणी आल्याने नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी शिरले असून प्रशासनाने सतर्कता वाढवली आहे.
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, नांदेड, हिंगोली, लातूर, जालना आणि धाराशिव जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यात यंदा आतापर्यंत सरासरीच्या केवळ २४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी २.९ मिलिमीटर पाऊस झाला असून जूनपासून आतापर्यंत १३५.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. केज तालुक्यात सर्वाधिक,
तर आष्टी तालुक्यात सर्वात कमी पाऊस झाला आहे. पुढील तीन दिवस कोणताही विशेष अलर्ट नसला तरी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Assembly adjourned : अतिवृष्टीचा विधिमंडळावरही परिणाम; विधानसभा स्थगित
विदर्भातील अकोला आणि अमरावती जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा, आमगाव आणि देवरी तालुक्यांत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. सालेकसा तालुक्यातील पिपरिया-रिसेवाडा मार्गावरील नदीत पुलाच्या कामादरम्यान अचानक पाण्याची पातळी वाढल्याने टिप्परसह अनेक वाहने नदीपात्रात अडकली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी नदी-नाले दुथडी भरून वाहत असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारा कायम असल्याने जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, पोलीस आणि स्थानिक स्वराज्य संस्था अलर्ट मोडवर आहेत. सखल भागातील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे, पूरग्रस्त नदी-नाल्यांजवळ जाणे टाळावे, अनावश्यक प्रवास करू नये तसेच हवामान विभाग आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पुढील २४ ते ४८ तास महाराष्ट्रातील अनेक भागांसाठी महत्त्वाचे ठरणार असून पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
__








