The hike in MSP rates for agricultural produce is like rubbing salt into farmers’ wounds : हेच का शेतकऱ्यांवरचे प्रेम?; केंद्र सरकारच्या निर्णयावर शेतकरी संघटनेची टीका
Akola केंद्र सरकारने जाहीर केलेल्या शेतमालाच्या हमीभाव वाढीवर शेतकरी संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य विलास तुळशीराम ताथोड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “सरकारने केलेली ही दरवाढ म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार आहे,” अशी टीका त्यांनी केली.
मक्याच्या दरात केवळ १० रुपयांची वाढ करण्यात आल्याचा उल्लेख करत ताथोड यांनी सरकारवर उपरोधिक शब्दांत निशाणा साधला. “एका क्विंटलमागे १० रुपये वाढ देऊन सरकार शेतकऱ्यांना श्रीमंत करण्याचा प्रयत्न करत आहे का? या पैशात शेतकऱ्याने चहा प्यावा की बिस्किटांचा पुडा घ्यावा, हा प्रश्न निर्माण झाला आहे,” असे त्यांनी म्हटले.
मुगाच्या दरात १२ रुपयांची वाढ करण्यात आल्याबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली. “ही वाढ म्हणजे शेतकऱ्यांप्रती सरकारचे अफाट प्रेम दर्शवते. आजच्या महागाईत इतक्या रकमेचे कोणतेही महत्त्व उरलेले नाही,” असे ते म्हणाले.
Shindi Gram Panchayat : शिंदी ग्रामपंचायतीत २०२४-२५ चे कॅशबुक गायब; ऑडिट पथक रिकाम्या हाताने परतले
भाताच्या दरात ७२ रुपयांची वाढ करण्यात आली असली तरी डिझेल, खते, बियाणे आणि मजुरीचे वाढते दर पाहता ही वाढ अत्यल्प असल्याचे त्यांनी सांगितले. “महागाई रॉकेटच्या वेगाने वाढत असताना सरकारची ही वाढ बैलगाडीने विमानाचा पाठलाग करण्यासारखी आहे,” असा टोला त्यांनी लगावला. सोयाबीनवर ३८० रुपये आणि कापसावर ५५७ रुपयांची वाढ जाहीर करण्यात आल्यावरही त्यांनी सरकारच्या ‘शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट’ या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “हीच जर उत्पन्न दुप्पट करण्याची नवी व्याख्या असेल, तर शेतकऱ्यांचे भवितव्य धोक्यात आहे,” असे ताथोड म्हणाले.
Ncp executive list : राष्ट्रवादीची तिजोरी आता पूर्णपणे पवार कुटुंबीयांच्या ताब्यात?
सूर्यफुलाच्या दरात ६२२ रुपयांची वाढ झाली असली तरी उत्पादन खर्चाच्या तुलनेत ती अपुरी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “उत्पादन खर्च, मजुरी आणि इतर खर्च पाहता शेतकऱ्याने आनंद साजरा करावा की रडावे, हेच समजत नाही,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. दरम्यान, केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात शेतकरी वर्गात तीव्र नाराजी असून हमीभावात वास्तववादी वाढ करण्याची मागणी त्यांनी केली आहे.








