Citizens climbed a water tank to register their protest of water shortage : पाणीटंचाईने संतप्त नागरिकांनी नोंदवला निषेध; जलजीवन मिशनच्या कामावर प्रश्नचिन्ह
Deulgao Mahi जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या निकृष्ट व अपूर्ण कामाविरोधात देऊळगाव मही येथील ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले स्टाईल’ आंदोलन करत प्रशासनाचा तीव्र निषेध नोंदविला. या अनोख्या आंदोलनाची परिसरात दिवसभर जोरदार चर्चा रंगली.
ग्रामपंचायत सदस्य आनंथा इगळे, संदीप राऊत, कारभारी देढे, सागर रोतळे आणि हरी शिंदे यांनी सकाळी ८ वाजल्यापासून पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले. भर पावसाळ्यातही गावात पिण्याच्या पाण्याची समस्या कायम असून, जलजीवन मिशनच्या कामातील दिरंगाई आणि निकृष्ट दर्जामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांनी पाणीपुरवठा विभागाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
Vijayraj shinde : व्यापाऱ्यांच्या भाजप प्रवेशामागे नेमकं काय?; साखरखेर्ड्यात राजकीय चर्चांना उधाण
आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, यापूर्वी संबंधित विभागाला सात दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे अखेर ग्रामस्थांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला.
आंदोलनाची दखल घेत पाणीपुरवठा विभागाच्या कनिष्ठ अभियंता श्रद्धा बनकर, आकाश कचरे आणि भूषण आडे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी अपूर्ण राहिलेले काम २ जुलैपासून पुन्हा सुरू करून पाण्याच्या टाकीपासून बसस्थानक चौकापर्यंतचे सर्व काम पूर्ण करण्यात येईल, असे लेखी आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
यावेळी ग्रामविकास अधिकारी वसंतराव चेके, सरपंच पती वसुदेव शिंगणे, माजी सरपंच रामा मस्के, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे शेख जुल्फेकार, पुरुषोत्तम (काका) शिंगणे, फराद शेठ, गणेश शिंगणे, निशांत देशमुख, प्रमोद शिंगणे, निखिल शिंगणे, गौरव सोनसळे, प्रशांत शिंगणे, लक्ष्मण शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.








