व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Legislative Council Election : जुना ‘धोका’ शिवसैनिक विसरलेले नाहीत! नागपुरात काँग्रेसच्या अतुल...

Legislative Council Election : जुना ‘धोका’ शिवसैनिक विसरलेले नाहीत! नागपुरात काँग्रेसच्या अतुल लोंढे यांच्या अडचणी वाढल्या

Congress Candidate Atul Londhe’s Troubles Deepen in Nagpur : उमेदवारी जाहीर, अर्जही दाखल; पण पक्षांतर्गत नाराजी उघडपणे समोर

Nagpur : “गरज सरो आणि वैद्य मरो…” अशाच काहीशा तीव्र भावना सध्या नागपुरातील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये उमटत आहेत. नागपूर महापालिका निवडणुकीत शेवटच्या क्षणापर्यंत ताटकळत ठेवून काँग्रेसने दिलेला ‘धोका’ शिवसैनिक अजूनही विसरलेले नाहीत. नेमकी हीच सल पुन्हा एकदा उफाळून आली असून, आगामी विधान परिषद निवडणुकीत आता आमच्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नका असा थेट आणि अप्रत्यक्ष इशारा शिवसेनेने (UBT) काँग्रेसला दिला आहे.

महाविकास आघाडीच्या महत्त्वपूर्ण बैठकीला शिवसेनेच्या एकाही प्रमुख पदाधिकाऱ्याने उपस्थिती न लावल्याने राजकीय वर्तुळात खळबळजनक चर्चा सुरू झाली आहे. आधीच संख्याबळ कमी असलेल्या काँग्रेससमोरील अडचणी यामुळे कमालीच्या वाढल्या आहेत.

काँग्रेसने विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पक्षाचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांना उमेदवारी जाहीर केली असून त्यांनी अर्जही दाखल केला. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी दोन वाजेपर्यंत रविभवन येथे काँग्रेस नेत्यांमध्ये प्रचंड खलबतं सुरू होती. या बैठकीला माजी मंत्री सुनील केदार, आमदार नितीन राऊत, शहर अध्यक्ष प्रफुल गुडधे, रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे उपस्थित होते. पण धक्कादायक बाब म्हणजे, शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आमदार विकास ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांनी या बैठकीकडे पूर्णपणे पाठ फिरवली. महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते संजय महाकाळकर हे प्रॉटोकॉलनुसार तरी येतील अशी अपेक्षा होती, पण त्यांनीही रविभवनकडे फिरकणे टाळले. त्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी उघड झाली आहे.

Fertilizer retail centre : कृषी विभागाचा खतविक्री केंद्रांवर धडक तपासणी मोर्चा; दोन केंद्रांना नोटीस

विजयाची कुठलीही शाश्वती नाही, भाजपच्या तुलनेत स्वतःचे संख्याबळ अत्यंत अपुरे आहे आणि पक्षातच एवढी नाराजी आहे; असं असताना सर्व गणितं ठाऊक असलेल्या अतुल लोंढे यांनी ही उमेदवारी स्वीकारलीच कशी असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

आता काँग्रेसच्या या अंतर्गत नाराजीत शिवसेनेच्या (UBT) संतापाची मोठी भर पडली आहे. उद्धव सेनेकडे नगर पालिकेतील १२ आणि महापालिकेतील २ असे एकूण १४ चे संख्याबळ आहे. आघाडीच्या बैठकीचे निमंत्रण असूनही शिवसेनेचा एकही नेता तिथे फिरकला नाही. यामागे काँग्रेसने भूतकाळात केलेले राजकारण कारणीभूत असल्याचे बोलले जाते. महापालिका निवडणुकीत काँग्रेस-शिवसेना आघाडीच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात होत्या. काँग्रेस १२ जागा सोडायला तयारही झाली होती.

Harshwardhan Sapkal : केंद्र-राज्य सरकारविरोधात काँग्रेसचा आसूड मोर्चा; गृहविभाग पांडू हवालदाराच्या हाती, काँग्रेस अध्यक्षांचा आरोप

मात्र, ऐनवेळी नितीन राऊत यांनी ‘उत्तर नागपूर सोडून बोला’ असा एकतर्फी पवित्रा घेतला, तर पूर्व नागपूरमधून आमदार अभिजित वंजारी यांनी विरोध केला. शेवटी अर्ज भरण्याच्या दिवशी काँग्रेसने आघाडी तोडल्याचे जाहीर केले, ज्यामुळे शिवसेनेची मोठी तारंबळ उडाली होती. जागा वाटापच्या बोलणीत गुंतवून ठेवून काँग्रेसने आम्हाला धोका दिल्याचा आरोपही शिवसेनेच्यावतीने करण्यात आला होता.

तत्पूर्वी विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसने शिवसेनेचा हक्काचा असलेला ‘दक्षिण नागपूर’ मतदारसंघ स्वतःकडे खेचून घेतला होता. त्यातच राज्य पातळीवर आघाडी असतानाही, रामटेक विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी उद्धव सेनेच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी केली. या बंडखोरीला सुनील केदार यांनी उघड पाठिंबा दिला आणि काँग्रेस खासदाराने प्रचार केला. याचा राग अद्यापही शिवसैनिकांच्या मनात धुमसत आहे. काँग्रेसला फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी आमची गरज भासते. गरज संपली की ते मित्रपक्षाला डावलतात, असा संतप्त सूर उद्धव सेनेच्या गोटातून येत आहे.

नागपूर महापालिकेत काँग्रेसने दिलेल्या धोक्याचा वचपा काढण्याची वेळ आता आली असल्याच्या भावना शिवसैनिकांमध्ये आहेत. एकीकडे अंतर्गत गटबाजी आणि दुसरीकडे मित्रपक्ष शिवसेनेने फिरवलेली पाठ, अशा दुहेरी चक्रव्यूहात काँग्रेसचे उमेदवार अतुल लोंढे अडकले असून, विधान परिषदेची ही लढाई काँग्रेससाठी अत्यंत खडतर होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

error: Content is protected !!