The plane will land directly in Nagpur only for voting! BJP corporators attend a political training session at ‘Rambhau Mhalgi’: घोडेबाजार आणि फोडाफोडी टाळण्यासाठी भाजपची रणनीती
Nagpur विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असली, तरी नागपूरच्या राजकीय पटलावर सध्या कमालीची शांतता आणि पडद्यामागे मोठ्या हालचाली पाहायला मिळत आहेत. १८ जून रोजी होणाऱ्या या मतदानापूर्वी नागपूर भाजपमध्ये एक मोठी रणनीती आखली गेली आहे. पक्षाचे सर्व नगरसेवक थेट मुंबईतून मतदानासाठीच नागपुरात अवतरणार असल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. घोडेबाजार आणि फोडाफोडीचे राजकारण टाळण्यासाठी भाजपने नेहमीप्रमाणे आपली तटबंदी मजबूत केली असून १५ ते १७ जून दरम्यान मुंबईतील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत भाजप नगरसेवकांसाठी विशेष ‘अभ्यास वर्गा’चे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व नगरसेवक १४ जूनलाच मुंबईला रवाना होतील आणि थेट १८ जूनला मतदानाच्या दिवशीच नागपुरात दाखल होतील. हा निव्वळ अभ्यास वर्ग आहे की मतदारांची सुरक्षित नाकेबंदी अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
Eknath Shinde Shivsena : अंतर्गत गटबाजीने नुकसान झाले, आता एकनाथ शिंदे लक्ष घालणार!
दुसरीकडे, उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख १ जून असतानाही अद्याप महायुती किंवा महाआघाडीने आपला पत्ता उघड केलेला नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात रविवारी होणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या चर्चेनंतरच भाजपच्या अंतिम उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, असे संकेत आहेत. सध्या भाजपकडून शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी, माजी जिल्हाध्यक्ष राजीव पोतदार आणि प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उपेंद्र कोठेकर यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे. तसेच इतर मतदारसंघांचा विचार करता भाजपकडून अरुण लखानी आणि काँग्रेसकडून शिवानी वडेट्टीवार यांच्या नावाची वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीसाठी, तर विक्की कुकरेजा यांच्या नावाची भंडारा-गोंदिया मतदारसंघासाठी चाचपणी सुरू आहे. सर्व उमेदवारांच्या नावावर पुढच्या आठवड्याच्या अखेरीस शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Amravati legislative election : अमरावती विधान परिषद निवडणुकीसाठी ४५३ मतदार सज्ज, आज निघणार अधिसूचना
एकीकडे भाजपमध्ये अशी मोठी रणनीती आखली जात असताना, दुसरीकडे काँग्रेस छावणीत मात्र पूर्णपणे शुकशुकाट पाहायला मिळत आहे. प्रदेश काँग्रेसने शहराध्यक्षांच्या माध्यमातून २५ तारखेपर्यंत इच्छुकांकडून अर्ज मागवले होते, परंतु मुदत संपत आली तरी अद्याप एकानेही अर्ज घेण्याचे किंवा दाखल करण्याचे धाडस दाखवलेले नाही. शहराध्यक्ष विकास ठाकरे सध्या निवडणुकीसाठी चाचपणी करत असले, तरी भाजप आणि काँग्रेसच्या नगरसेवकांच्या एकूण संख्याबळात असलेली लक्षणीय तफावत पाहता काँग्रेसच्या इच्छुकांनी सध्या ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेत संयम पाळणेच पसंत केले आहे. पुढील आठवड्याच्या शेवटी या निवडणुकीचे चित्र पूर्णपणे स्पष्ट होणार असले, तरी भाजपची ही ‘मुंबई डिप्लोमसी’ सध्या नागपूरच्या राजकारणात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहे.








