व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Legislative Elections : वर्ध्यात लखानी, भंडाऱ्यात कुकरेजा; मग नागपुरात कोण? भाजपमध्ये उमेदवारीसाठी...

Legislative Elections : वर्ध्यात लखानी, भंडाऱ्यात कुकरेजा; मग नागपुरात कोण? भाजपमध्ये उमेदवारीसाठी तगडी स्पर्धा!

tough competition in BJP for Legislative elections : नागपूर ग्रामीणमधील नेत्याला संधी मिळण्याची शक्यता, नेत्यांपुढे मोठा पेच

Nagpur राज्यात विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर होताच विदर्भातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून भाजपमध्ये उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा सुरू झाली आहे. विदर्भातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपचे वर्चस्व असल्याने पक्ष आता आपले खास ठेवणीतील उमेदवार बाहेर काढणार असल्याचे बोलले जात आहे. या अंतर्गत भंडारा-गोंदिया आणि वर्धा मतदारसंघात नागपूरवरूनच उमेदवार पाठवण्यात येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, गोंदिया–भंडारा मतदारसंघातून मुख्यमंत्र्यांच्या खास मर्जीतील आणि मोठे बांधकाम व्यावसायिक वीरेंद्र कुकरेजा यांचे नाव जवळपास फायनल झाले आहे. या मतदारसंघातून यापूर्वी आमदार परिणय फुके निवडून आले होते. तत्कालीन राजकीय समीकरणांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची संख्या अधिक असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय डावपेचामुळे फुके यांनी विजय मिळवला होता; मात्र आता प्रफुल्ल पटेल महायुतीत असल्याने येथील समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत.

Eknath shinde : संजय शिरसाटांच्या विधानानंतर एकनाथ शिंदे संतप्त, दिली कडक समज

दुसरीकडे, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली हा मतदारसंघ तीन जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांचा असून येथे काँग्रेस आणि भाजप दोघांनाही समान संधी असल्याने अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे. येथे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी दावेदारी केल्यामुळे, वडेट्टीवारांसारख्या तगड्या उमेदवाराचा सामना करण्यासाठी भाजपने अरुण लखानी यांना मैदानात उतरवण्याचे ठरवले असल्याचे समजते.

भंडारा आणि वर्धा या दोन्ही मतदारसंघांतील उमेदवारांना पूर्ण सहा वर्षांचा कार्यकाळ मिळणार असून हे दोन्ही संभाव्य उमेदवार हिंदी भाषिक आहेत. त्यामुळे आता नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पोटनिवडणुकीत ओबीसी समाजाचा उमेदवार देण्यात यावा, अशी मागणी पक्षातून जोर धरू लागली आहे. नागपूरची ही जागा राज्याचे महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे कामठी विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्याने रिक्त झाली असून, या जागेवरील नवनिर्वाचित उमेदवाराला केवळ १९ महिन्यांचाच कार्यकाळ मिळणार आहे.

Prasad Lad : ‘मी दूत म्हणून काम करेन’, प्रसाद लाडांचा जरांगेंना शब्द, उपोषणापूर्वी चर्चेला वेग

शहरातून संजय भेंडे यांना विधान परिषदेवर आधीच पाठवण्यात आले असल्याने, आता ग्रामीण भागाला प्राधान्य द्यावे अशी मागणी जोर धरत आहे. यात भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांना आमदार करा असे आवाहन यापूर्वी केले होते, त्यामुळे ही संधी पोतदार यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

मात्र, वर्धा आणि भंडाऱ्याचे उमेदवार निश्चित करताना भाजपने आता नागपुरात ओबीसी समाजाला स्थान द्यावे याकरिता किशोर रेवतकर आणि योगेश खडतकर यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. रेवतकर यांच्या समर्थकांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजपच्या बड्या नेत्यांकडे निवेदने दिली असून सुमारे २५ वर्षांपासून ते भाजपमध्ये निष्ठेने काम करत आहेत आणि ते संघाचे स्वयंसेवकही आहेत.

Petrol Price hike : ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडून पेट्रोल पंपवर ‘मेलोडी चॉकलेट’चे वाटप

नागपूर जिल्ह्यात भाजपच्या मतदारांची संख्या सर्वाधिक असल्याने भाजपचा उमेदवार आरामात निवडून येऊ शकतो, अशी सद्यस्थिती आहे. दरम्यान, कोणतीही राजकीय रिस्क न घेता पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. त्यामुळे आता या चुरशीच्या स्पर्धेत नागपूर मतदारसंघातून नेमकी कोणाच्या नावावर मोहोर उमटते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!