व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Local Body Elections : ‘रसद’ रोखण्यासाठी ९० पथकांचा कडक ‘वॉच’!

Local Body Elections : ‘रसद’ रोखण्यासाठी ९० पथकांचा कडक ‘वॉच’!

Strict watch by 90 teams to stop illegal supplies : नगरपरिषद निवडणुकांत पैशाच्या खेळावर प्रशासनाची नजर

Buldhana जिल्ह्यातील अकरा नगरपरिषदांच्या निवडणुकीचा प्रचार वेग घेत असताना, निवडणुकीत ‘रसद’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैसा, दारू व प्रलोभनांच्या वाहतुकीवर पूर्णविराम लावण्यासाठी प्रशासनाकडून तब्बल ९० विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. शहरांच्या सीमांवर नाके, संशयित वाहनांची तपासणी आणि उमेदवारांच्या खर्चावर बारकाईने लक्ष ठेवून निवडणुका ‘स्वच्छ, पारदर्शक आणि भयमुक्त’ करण्याचे आव्हान प्रशासनाने स्वीकारले आहे.

राज्य निवडणूक आयोगाकडून आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार — मतदारांना प्रलोभन देणे, पैसा किंवा वस्तूंचे वाटप, दारूची बेकायदेशीर वाहतूक अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्ह्यात अनेक पातळीवर पथके सज्ज आहेत.

२ डिसेंबर रोजी बुलढाणा, चिखली, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, शेगाव, मेहकर, लोणार, जळगाव जामोद, नांदुरा, मलकापूर आणि खामगाव या नगरपरिषदांसाठी मतदान होणार आहे. रिंगणात राहिलेल्या उमेदवारांना मंगळवारी चिन्ह वाटप होणार असले तरी बहुतेक पक्षांनी जोरदार प्रचारयात्रा आधीच सुरू केल्या आहेत.

Local Body Elections : सायलेंट मतदार ठरणार निर्णायक, उमेदवारांपुढे आव्हान

तपासणी नाके–पथकांचा घट्ट ‘वॉच’

प्रशासनाने पुढील प्रकारची पथके कार्यरत केली आहेत :

फिरती तपासणी पथके (एफएसटी)

स्थिर तपासणी नाके (एसएसटी)

व्हिडिओ पाळत पथके (व्हीएसटी)

व्हिडिओ पाहणी व विश्लेषण पथके (व्हीव्हीटी)

खर्च निरीक्षण पथके

शहरांच्या सीमांवर सतत तपासणी सुरू असून, संशयास्पद वाहनांवर सक्त लक्ष ठेवले जात आहे.

अशी आहे पथकांची संख्या

एकूण पथके : ९०

भरारी पथके : २६

स्थिर पथके : ३२

व्हिडिओ पाळत पथके : २१

व्हिडिओ विश्लेषण पथके : ११

तक्रार निवारण पथकेही सज्ज

आचारसंहितेचे उल्लंघन रोखण्यासाठी प्रत्येक नगरपरिषदेत स्वतंत्र तक्रार निवारण पथक कार्यरत आहे. मिळणाऱ्या तक्रारींवर तत्काळ कारवाईचा आदेश आयोगाने प्रशासनाला दिला आहे.

बँका–पतसंस्थांवरील व्यवहारांवर ‘फोकस’

निवडणुकीत पैशांची उलाढाल वाढते, हे गृहीत धरून आयोगाने खासगी बँका व पतसंस्थांमधील मोठ्या रकमेच्या व्यवहारांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

खात्यातून मोठी रक्कम जमा–काढली जाणे, अचानक वाढलेले व्यवहार इत्यादींवर अधिकाऱ्यांची नजर असणार आहे.

विविध पथकांची जबाबदारी

एफएसटी (भरारी पथके)
पैशाचे वाटप, दारू–शस्त्रांची अवैध वाहतूक, मतदारांना देण्यात येणाऱ्या भेटवस्तूंवर तत्काळ कारवाई.

एएसटी (सहायक खर्च निरीक्षक)
उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाचा तपशील, बिल, व्हाउचर, रॅली–जाहिर सभांचा खर्च यांची तपासणी.

व्हीएसटी
मोठ्या सभांचे व्हिडिओ शूटिंग, प्रचारातील संशयास्पद खर्चाचे दृश्यात्मक पुरावे गोळा करणे.

Local Body Elections : भाजप व वंचितमध्ये थेट लढत; काँग्रेसचा अस्तित्वासाठी संघर्ष

व्हीव्हीटी
सर्व व्हिडिओ पाहणी, संशयित खर्चांची नोंद, पाहणी अहवाल खर्च पथकाला सादर करणे.

प्रशासनाची कडक नजर, उमेदवारांचा वाढता खर्च आणि मतदारांपर्यंत पोहोचण्याची धडपड — या सर्वांच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील निवडणूक अधिकच तापण्याची चिन्हे आहेत.

error: Content is protected !!