eknath-shinde-big-warning-to-uddhav-thackeray-on-shivsena-operation-tiger-trailer : ‘ऑपरेशन टायगर’वरून राजकीय वर्तुळात खळबळ
Mumbai : शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत विरोधकांवर तुफान हल्लाबोल केला. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात चर्चेत असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे राजकीय वातावरण आणखी तापले आहे. “ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है!” असे म्हणत त्यांनी विरोधकांना अप्रत्यक्ष इशारा दिल्याने आगामी काळात आणखी मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गोरेगाव येथे आयोजित शिवसेनेच्या वर्धापन दिन मेळाव्यात बोलताना एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणातून विरोधकांवर बोचरी टीका केली. विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील संभाव्य फुटीच्या चर्चांदरम्यान त्यांनी केलेल्या विधानांमुळे राजकीय चर्चांना नवे वळण मिळाले आहे.
“एकनाथ शिंदे काय बोलणार, व्यासपीठावर कोण येणार, काय होणार याची चर्चा सुरू होती. पण आज हा टायगर तुमच्यासमोर उभा आहे,” असे सांगत त्यांनी भाषणाची सुरुवात केली. विरोधकांवर निशाणा साधताना त्यांनी काही जण सतत टीका करत असल्याचा उल्लेख केला आणि “कुत्ते झुंड में आके भोंकते है, शेर अकेला आता है,” असे वक्तव्य करत सभागृहात जोरदार प्रतिसाद मिळवला.
Uddhav Thackeray : नेतृत्वावर विश्वास नसेल तर शिवसेना पक्षप्रमुख पद सोडायलाही तयार’
शिंदे पुढे म्हणाले की, “कुत्ते भोंकते रहते है, टायगर शिकार करता है. कुत्ते भोंकते रहते है और टायगर दहाडता है.” या शब्दांत त्यांनी स्वतःच्या राजकीय भूमिकेचे समर्थन करत विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. यावेळी त्यांनी शिवसेना ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांवर चालणारी संघटना असल्याचा दावा केला.
राज्यात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांवर थेट भाष्य टाळत असतानाही शिंदे यांनी दिलेला “ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है” हा संदेश राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. ठाकरे गटातील आणखी काही नेते किंवा पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करू शकतात, अशा चर्चांना या वक्तव्यामुळे अधिक बळ मिळाले आहे.
शिवसेनेच्या स्थापनेचा उद्देश अधोरेखित करताना शिंदे म्हणाले की, हा पक्ष मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी जन्माला आला. महाराष्ट्राच्या अस्मितेची चळवळ उभी करणाऱ्या या पक्षाने समाजातील विविध घटकांना न्याय देण्याचे काम केले आहे. मराठीचा निर्धार, देशद्रोह्यांवर प्रहार, महिलांचा स्वाभिमान, शेतकऱ्यांचे हित आणि वारकरी संप्रदायाचा सन्मान म्हणजे शिवसेना, असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका करताना “मी डॉक्टर नसलो तरी अजूनही ऑपरेशन करतो आणि ऑपरेशन करायला वाघाचं काळीज लागतं, लांडग्याचं नाही. लांडग्याचं कातडं पांघरून वाघ होता येत नाही,” अशी टीका केली. या वक्तव्याचा रोख नेमका कोणाकडे होता, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली.
चार वर्षांपूर्वीच्या राजकीय संघर्षाची आठवण करून देताना शिंदे म्हणाले की, त्यांना अनेक धमक्या देण्यात आल्या होत्या. मात्र त्या काळातही त्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता आपली भूमिका कायम ठेवली. “मुंबईत येण्याची धमकी देणारे लोक घरात बसून ऑनलाईन पाहत होते, पण मी रस्त्याने फिरलो, लोकांमध्ये गेलो,” असा दावा त्यांनी केला.
विरोधकांकडून वारंवार दिल्या जाणाऱ्या आव्हानांवर प्रतिक्रिया देताना शिंदे यांनी शिवसैनिकांच्या ताकदीचा उल्लेख केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारे शिवसैनिक कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची क्षमता ठेवतात, असे ते म्हणाले.
शिवसेनेच्या वर्धापन दिनी एकनाथ शिंदे यांनी केलेले आक्रमक भाषण आणि ‘ट्रेलर-पिक्चर’चा उल्लेख हे आगामी राजकीय रणनीतीचे संकेत मानले जात आहेत. एका बाजूला उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख पद सोडण्याची तयारी दर्शवत भावनिक संदेश दिला असताना, दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांनी शक्तिप्रदर्शनातून विरोधकांना थेट इशारा दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शिवसेना विरुद्ध शिवसेना हा संघर्ष आगामी काळात आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.








