ratnakar-mahajan-passes-away-pune-congress-veteran-leader : ज्येष्ठ नेते रत्नाकर महाजन यांचे निधन
Pune: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी प्रदेश काँग्रेस प्रवक्ते आणि समाजवादी विचारवंत डॉ. रत्नाकर महाजन यांचे शनिवारी सकाळी पुण्यात निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने काँग्रेससह पुरोगामी आणि सामाजिक चळवळीतील एक अभ्यासू, संयमी आणि निष्ठावंत नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. शनिवारी दुपारी एक वाजता पुण्यातील नवी पेठ येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
डॉ. रत्नाकर महाजन यांचा जन्म १४ जून १९४६ रोजी झाला. ते मूळचे पुणे जिल्ह्यातील इंदापूरचे होते. त्यांचे शिक्षण इंदापूरमध्ये झाले. उच्च शिक्षणासाठी ते पुण्यात आले आणि पुढे पुण्यातच स्थायिक झाले. डॉक्टर म्हणून शिक्षण घेतल्यानंतर काही काळ त्यांनी नोकरी केली; मात्र समाजवाद, गांधीवादी विचार आणि सामाजिक कार्याची ओढ त्यांना राजकीय-सामाजिक क्षेत्रात घेऊन आली.
युवक क्रांती दल, सेवा दल, भारत जोडो अभियान तसेच विद्यार्थी चळवळींमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. आणीबाणीच्या काळात त्यांनी सरकारविरोधात ठाम भूमिका घेत आंदोलनात सहभाग नोंदवला. या काळात त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. जयप्रकाश नारायण, डॉ. राम मनोहर लोहिया, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे आणि ग. प्र. प्रधान यांसारख्या समाजवादी विचारवंतांचा त्यांच्या वैचारिक जडणघडणीवर मोठा प्रभाव होता. आगरकर आणि महात्मा गांधी यांच्या विचारांचाही त्यांनी आपल्या कार्यात अंगीकार केला.
१९८६-८७ च्या काळात शेतकरी, वीज, पाणी आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी त्यांनी इंदापूर तालुक्यात पदयात्रा काढली. लोकबोधिनी संस्थेच्या माध्यमातून तरुणांसाठी विविध शिबिरे घेत सामाजिक प्रश्नांवर वैचारिक प्रबोधन आणि नेतृत्वनिर्मितीचे काम त्यांनी केले. त्याचबरोबर ‘शिदोरी’ मासिकाच्या माध्यमातून पुरोगामी विचार तरुणांपर्यंत पोहोचविण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यामुळे त्यांची ओळख ‘शिदोरीकार’ म्हणूनही झाली.
राजकीय प्रवासात काही काळ त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केले. राज्य नियोजन मंडळाच्या कॅबिनेट दर्जाच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये दाखल झाले आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून त्यांनी पक्षाची भूमिका विविध व्यासपीठांवर प्रभावीपणे मांडली.
New Point System : नियम तोडाल तर फक्त चलान नाही, थेट परवान्यावर गदा!
विशेषतः डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात काँग्रेसची राजकीय पिछेहाट सुरू असताना पक्षाची बाजू अभ्यासपूर्ण आणि संयमी पद्धतीने मांडण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. आक्रमक भाषा, वैयक्तिक टीका किंवा अपशब्दांचा आधार न घेता मुद्देसूद युक्तिवाद करण्याची त्यांची शैली राजकीय वर्तुळात विशेष ओळखली जात होती. समाजवाद, गांधीवाद, पुरोगामी विचार आणि राजकीय नैतिकता यांचा आग्रह आयुष्यभर जपणाऱ्या रत्नाकर महाजन यांच्या निधनाने महाराष्ट्रातील सामाजिक आणि वैचारिक चळवळीची मोठी हानी झाली आहे.








