व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण अमित शहा थापाड्या आहेत, उद्धव ठाकरेंचा पलटवार

अमित शहा थापाड्या आहेत, उद्धव ठाकरेंचा पलटवार

अजित पवारांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमात केलेल्या आरोपांवर घेतला समाचार

Mumbai माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यावरून राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोरोना काळाचा दाखला देत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अमित शहा हे थापाड्या आहेत आणि त्यांनी बोललेले प्रत्येक शब्द हे ब्रह्मवाक्य नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी शहा यांच्यावर निशाणा साधला.

अजित पवारांना अटकेच्या धमक्या देऊन महायुतीत आणलं

अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण अमित शहा यांच्या हस्ते होणे ही दुर्दैवाची बाब असल्याचे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.

यासंदर्भात बोलताना ठाकरे म्हणाले की, ज्या भाजपने आणि अमित शहा यांनी यापूर्वी अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, तेच आज त्यांचे गुणगान गात आहेत. खरेतर या कार्यक्रमात शहा यांनी मागील खोट्या आरोपांबद्दल अजित पवारांच्या पुतळ्यासमोर माफी मागायला हवी होती. भाजपच्या नेतृत्वात कोणतीही सुधारणा होण्याची शक्यता नसल्याचेही त्यांनी नमूद केले. अमित शहा यांची जायची वेळ झाली असून रिजिम बदलली पाहिजे असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

‘माझा भाऊ गेला आहे, हा ब्रेकिंग न्यूजचा विषय नाही’

महाराष्ट्रात येऊन राजकीय विधाने करण्यापेक्षा केंद्रीय गृहमंत्र्यांनी अशांत असलेल्या मणिपूरला भेट द्यायला हवी होती, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

मणिपूरमधील परिस्थिती हाताळण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत, तेथील नागरिकांचे फोनही उचलले जात नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. देशातील सध्याच्या नेतृत्वात बदल होणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी यावेळी मांडले. उत्तर प्रदेशातील आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच अमित शहा यांनी कोरोना काळातील मुद्दे उपस्थित केल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला. कोरोनाच्या कठीण काळात मुंबईतून उत्तर प्रदेशात जाणाऱ्या कामगारांसाठी आपणच तातडीने रेल्वे सुरू करण्याची मागणी केली होती, मात्र भाजप नेत्यांनी त्यास विरोध केला, असे ठाकरे म्हणाले. उत्तर प्रदेशात परतलेल्या कामगारांनी तेथील व्यवस्थेवर नाराजी व्यक्त केली होती आणि मुंबईत मिळणाऱ्या सोयीसुविधा अधिक चांगल्या होत्या अशा प्रतिक्रिया दिल्या होत्या, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

error: Content is protected !!