Girish Mahajan reaches Rajmudri ; will plant 15 thousand indigenous trees : गिरीश महाजन राजमुद्रीला पोहोचले;15 हजार देशी झाडांची लागवड करणार
Nashik: नाशिकमध्ये 2027 च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीत गती आली असतानाच तपोवन परिसरातील साधूग्राम प्रकल्पासाठी 1800 झाडांची तोड होणार असल्याची माहिती समोर आली आणि संतापाची लाट उसळली. साधू-महंतांच्या तात्पुरत्या निवासासाठी 1150 एकरांवर साधूग्राम उभारण्याचे नियोजन असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केल्यानंतर पर्यावरणप्रेमी, नागरिक, स्थानिक संघटना आणि अनेक सेलिब्रिटींनी जोरदार विरोधाला सुरुवात केली.
नाशिकच्या तपोवन परिसरात सध्या आंदोलन सुरू असताना राज्य सरकारकडून महत्त्वाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. वाद शांत करण्यासाठी आणि पर्यावरण संतुलनाचे आश्वासन देण्यासाठी सरकारने शहरात 15 हजार देशी झाडांची मोठी लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन स्वतः दक्षिण भारतातील राजमुद्री येथे पोहोचले आणि लिंब, जांभूळ, आंबा, पिंपळ, वड यांसारख्या 15 फूट उंचीच्या सुमारे 15 हजार देशी झाडांची निवड केली.
Local Body Elections : ११ पालिकांच्या निकालावर ठरेल भविष्यातील राजकारण
या झाडांचा वापर करून नाशिक शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणात हरितीकरण मोहिम राबवली जाणार आहे. झाडांची देखभाल मनपा उद्यान विभागाकडून ठिबक सिंचन आणि जैविक खतांच्या माध्यमातून केली जाणार असल्याचेही सरकारने स्पष्ट केले. पहिल्या टप्प्यातील एक ते दोन हजार झाडांचा लॉट येत्या आठवड्यात नाशिकमध्ये दाखल होणार आहे. साधूग्राम परिसरातील एक्झिबिशन सेंटरचे टेंडर रद्द केल्यानंतर वृक्ष लागवडीचा निर्णय घेण्यात आला असून “आधी 15 हजार झाडांची लागवड, त्यानंतरच साधूग्रामच्या उभारणीदरम्यान तपोवनातील झाडांना हात लावणार आणि बहुतांश झाडांचे पुनर्रोपण केले जाणार,” अशी भूमिका गिरीश महाजन यांनी स्पष्ट केली आहे.
वृक्षतोडीच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाने उग्र रूप घेतले असताना महापालिकेकडून आंदोलकांना उद्या अधिकृत चर्चेसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. प्रशासनाने साधूग्राम उभारण्यासाठी काही झाडे काढण्याची भूमिका कायम ठेवली असली तरी आंदोलनाचा दबाव वाढत असल्याने उद्याची बैठक निर्णायक ठरणार आहे. दरम्यान, साधूग्रामसाठी प्रस्तावित एक्झिबिशन सेंटर प्रकल्पालाही स्थगिती देण्यात आली असून कुंभमेळ्यात साधू-महंतांसाठी तात्पुरती व्यवस्था येथे करण्यात येणार होती.
Local Body Elections : ‘क्रॉस वोटिंग’ची चलती! निकाल कोणाच्या पारड्यात?
कुंभमेळ्यानंतर त्याच डोमचे एक्झिबिशन सेंटरमध्ये रुपांतर करण्याचे नियोजन होते. आता उद्याच्या चर्चेनंतर आंदोलनाची आणि प्रकल्पाची पुढील दिशा ठरणार आहे, तर सरकारकडून सुरू झालेली झाड लागवड मोहिम तपोवनातील वृक्षतोडीवरील वाद शमवू शकेल का, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.








