व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Nitin gadkari : ‘१ रुपयाचं काम, १० रुपयांची पब्लिसिटी’; नितीन गडकरींचा राजकारण्यांना...

Nitin gadkari : ‘१ रुपयाचं काम, १० रुपयांची पब्लिसिटी’; नितीन गडकरींचा राजकारण्यांना टोला

nitin-gadkari-call-for-water-revolution-and-public-movement-in-vidarbha : पाणीप्रश्नावर जलक्रांतीसाठी जनआंदोलनाचे आवाहन

Nagpur : नागपूरमध्ये आयोजित जलक्रांती परिषदेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पाणीटंचाई, सिंचन, पर्यावरण आणि ग्रामीण विकास या मुद्द्यांवर भाष्य करताना राजकारणातील दिखावूपणावर जोरदार टीका केली. “राजकारणात सामान्यतः एक रुपयाचं काम आणि दहा रुपयांची पब्लिसिटी केली जाते. मात्र आम्ही पाणी आणि सिंचन क्षेत्रात प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता जमिनीवर मोठं काम करून दाखवलं,” अशा शब्दांत गडकरी यांनी राजकीय पद्धतीवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. विदर्भातील शेतकरी आत्महत्या, पाण्याचे नियोजन आणि जलसंधारण यावर बोलताना त्यांनी पाणीप्रश्न सोडवण्यासाठी आता जनआंदोलन उभं करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले.

पूर्ती जलसिंचन कल्याणकारी संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेला अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे हेही उपस्थित होते. यावेळी बोलताना गडकरी म्हणाले की, नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांना अभिनेता म्हणून नव्हे तर ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून त्यांनी पाणी क्षेत्रात केलेल्या कामामुळे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून बोलावण्यात आले आहे.

Uddhav thackeray : सभागृहात दांड्या, उद्धव ठाकरेंची 4 वर्षांत फक्त 42 दिवस हजेरी !

विदर्भातील पाणीटंचाई आणि शेतकरी आत्महत्यांवर भाष्य करताना गडकरी यांनी स्पष्ट केले की, विदर्भात झालेल्या हजारो शेतकरी आत्महत्यांचे मुख्य कारण म्हणजे सिंचनाचा अभाव आहे. “गावाचं पाणी गावात, शेताचं पाणी शेतात आणि जमिनीचं पाणी जमिनीत मुरलं पाहिजे. त्याशिवाय शेतकऱ्याचं जीवन बदलणार नाही,” असे ते म्हणाले. देशात पाण्याची कमतरता नसून योग्य नियोजनाचा अभाव असल्याचेही त्यांनी नमूद केले.

देशाच्या फाळणीनंतर भारताच्या वाट्याला आलेल्या तीन नद्यांचे पाणी आजही पाकिस्तानात वाहून जात असल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी पाणी व्यवस्थापनावर सरकार आणि समाज दोघांची जबाबदारी असल्याचे सांगितले. “आपण आपसात भांडत बसतो, पण हे पाणी अडवण्याचा विचार करत नाही,” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. नद्यांच्या देखभाल आणि स्वच्छतेसाठी देशात स्वतंत्र मंत्रालय किंवा यंत्रणा नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.

Bike taxi action : राज्यातील बेकायदा बाइक टॅक्सी सेवा पुन्हा चर्चेत

बुलढाणा पॅटर्नचा उल्लेख करत गडकरी म्हणाले की, नदी-नाल्यांचे खोलीकरण आणि जलसंधारणाच्या कामांमुळे 171 गावांना थेट फायदा झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून रस्त्यांच्या बाजूला तलाव तयार करण्याचा आणि खोलीकरणाचा प्रयोग यशस्वी ठरल्याचे सांगत त्यांनी दोन दिवसांपूर्वी पंजाबचे मुख्यमंत्रीही हा प्रकल्प पाहण्यासाठी नागपुरात आल्याची माहिती दिली. अकोला-अमरावती मार्गावर तयार करण्यात आलेल्या 36 तलावांमुळे खारपाण पट्ट्यातील परिसरात मोठा बदल झाल्याचे त्यांनी सांगितले.

पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेची सांगड घालताना गडकरी यांनी नागपूर शहराचा आदर्शही मांडला. नागपूर हे सांडपाणी शुद्ध करून विकणारे देशातील पहिले शहर ठरल्याचे सांगत त्यांनी या प्रकल्पातून महापालिकेला दरवर्षी सुमारे 300 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याची माहिती दिली. भविष्यात सीएनजी आणि इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांचा वापर वाढल्यास प्रदूषण कमी होऊन देशाची अर्थव्यवस्था मजबूत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Silver import : मोदी सरकारचा चांदी आयातीवर मोठा ‘सर्जिकल स्ट्राइक’

देशात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचा वापर रस्ते बांधकामासाठी करण्यात येत असल्याचे सांगताना त्यांनी 1 कोटी 40 लाख टन कचऱ्याचा राष्ट्रीय महामार्ग उभारणीत वापर झाल्याची माहिती दिली. भविष्यात कचऱ्यापासून रस्ते तयार करण्याच्या संकल्पनेवर काम सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. देशाला दरवर्षी 22 लाख कोटी रुपयांचे इंधन आयात करावे लागते, त्याला पर्याय म्हणून इथेनॉलवर चालणाऱ्या वाहननिर्मितीवर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी गडकरी यांनी लोकसहभागाचे महत्त्व अधोरेखित करत पावसाचा एकही थेंब गावाबाहेर जाऊ न देण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले. “नोकरदार व्यक्ती निवृत्तीनंतरच्या भविष्यासाठी पैसा साठवते, मग आपण भविष्यासाठी पाणी का साठवत नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. देव आणि सरकारवर अवलंबून न राहता प्रत्येक गावाने नदी-नाले खोलीकरण, जलसंधारण आणि पाणीसाठा निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

Sudhir mungantiwar : पाण्यासाठी तिसरे महायुद्ध टाळायचे असेल तर ‘जलयोद्धे’ तयार करा

पाणी असेल तर शेती समृद्ध होईल आणि त्यातून सामाजिक तसेच आर्थिक परिवर्तन घडेल, असे सांगताना गडकरी यांनी पाणीप्रश्न ही केवळ सरकारी जबाबदारी नसून लोकचळवळीचा विषय असल्याचे स्पष्ट केले. “ही समस्या काही लोकांच्या प्रयत्नांनी सुटणार नाही. पाण्यासाठी आता जनआंदोलन उभं करावं लागेल,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

__

error: Content is protected !!