supriya-sule-criticizes-central-government-over-fuel-price-hike-after-meeting-pm-modi : सुप्रिया सुळेंचा सवाल, “सामान्यांनी जगायचं कसं?”
Mumbai : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत सहकुटुंब भेट घेतली. लेक रेवती सुळेच्या विवाहाचे निमंत्रण देण्यासाठी झालेल्या या भेटीत त्यांचे व्याही अरुण लखानी आणि जावई सारंग लखानी देखील उपस्थित होते. मात्र या भेटीनंतर लगेचच सुप्रिया सुळे यांनी वाढत्या पेट्रोल-डिझेल दरवाढीवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका करत सरकारला अनेक प्रश्न विचारले आहेत.
मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना सुप्रिया सुळे यांनी देशात निर्माण झालेल्या महागाईच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. गेल्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असून सामान्य नागरिक, शेतकरी आणि मध्यमवर्गीयांचे आर्थिक गणित कोलमडल्याचे त्यांनी म्हटले. गेल्या ११ दिवसांत देशभरात पेट्रोल-डिझेलच्या दरात तीन वेळा वाढ झाल्याचा उल्लेख करत त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर निशाणा साधला.
अमेरिका-इराण संघर्षामुळे जागतिक स्तरावर इंधन संकट निर्माण झाले असताना भारतात त्याचे गंभीर परिणाम दिसू लागल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. “आम्ही सातत्याने याविषयी बोलत होतो. राहुल गांधी आणि इंडिया आघाडीने संसदेत अनेकदा हा मुद्दा उपस्थित केला. मात्र सरकारने त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही,” अशी टीका त्यांनी केली.
सामान्य नागरिकांना पेट्रोल-डिझेलसाठी रांगेत उभे राहावे लागत असल्याचा दावा करत त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणींचाही मुद्दा उपस्थित केला. “मंत्री सांगत आहेत की युरिया मिळणार नाही. मग शेतकऱ्यांनी शेती कशी करायची? देशात नेमकं काय सुरू आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
“कशाचंही सोंग घेता येतं, पण पैसे आणि अन्नधान्याचं सोंग घेता येत नाही,” असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाल्याचे सांगितले. देशासमोर मोठं राष्ट्रीय संकट उभं राहत असल्याची गंभीर टिप्पणीही त्यांनी केली.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या विधानांमधील विरोधाभासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “देवेंद्र फडणवीस म्हणतात की देशात पुरेसा साठा आहे, तर छगन भुजबळ म्हणतात की फक्त ३० दिवसांचा साठा उपलब्ध आहे. मग सरकारचं नेमकं नियोजन काय आहे?” असा सवाल त्यांनी केला.
राहुल गांधी वारंवार संसदेत या मुद्द्यांवर बोलत असल्याचा उल्लेख करत “सरकार स्पष्ट आणि खरं का बोलत नाही?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाची आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत विधान परिषद निवडणुका, वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि देशासमोरील आर्थिक आव्हानांवर चर्चा होणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
“निवडणुका येतील आणि जातील, पण कर भरणारा सामान्य माणूस कसा जगणार हा खरा प्रश्न आहे,” असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारने महागाई आणि इंधन संकटावर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली.
__








