व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home क्राईम Vidarbha Farmers : एचटीबीटी बियाणांचा साडेचार लाखांचा साठा जप्त; कृषी विभागाची संग्रामपूर...

Vidarbha Farmers : एचटीबीटी बियाणांचा साडेचार लाखांचा साठा जप्त; कृषी विभागाची संग्रामपूर तालुक्यात कारवाई

HTBT seeds stock worth ₹4.5 lakh seized : शासनमान्यता नसलेल्या कापूस बियाण्यांची जादा दराने विक्री

Sangrampur शासनमान्यता नसलेल्या संशयित एचटीबीटी कापूस बियाण्यांची जादा दराने विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक केला जात असलेला सुमारे साडेचार लाख रुपये किमतीचा अवैध साठा कृषी विभागाने संग्रामपूर तालुक्यातील खिरोडा गावाजवळ जप्त केला. या कारवाईत अकोला जिल्ह्यातील दोघांना रंगेहात पकडण्यात आले असून एक आरोपी फरार झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संग्रामपूर तालुक्यातून काहीजण अवैध एचटीबीटी कापूस बियाण्यांची वाहतूक करीत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती. त्यानुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे, अमरावतीचे गुणनियंत्रण तंत्र अधिकारी नितीन लोखंडे आणि विभागीय गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला.

Jaljiwan Mission : जलजीवन मिशनमध्ये अनियमितता; क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा ठिय्या आंदोलन

संग्रामपूर, जळगाव जामोद व शेगाव तालुक्यांतील प्रमुख मार्गांवर बियाणे निरीक्षकांकडून वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली. संग्रामपूर तालुक्यातील खिरोडा गावाजवळ मारुती सुझुकी कंपनीचे पांढऱ्या रंगाचे ईको वाहन (क्र. एमएच-३०-बीडब्ल्यू-९५८५) संशयाच्या आधारे थांबविण्यात आले. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये पांढऱ्या रंगाचे नऊ कट्टे आढळले.

या कट्ट्यांमध्ये विविध कंपन्यांच्या संशयित अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाण्यांची पाकिटे सापडली.या प्रकरणी गुलाबराव मुरलीधर ठाकरे व शंकर उत्तम दांदळे (दोघे रा. सांगोला, ता. पातूर, जि. अकोला) यांना ताब्यात घेण्यात आले. तर विनोद पाटील उर्फ विनोद हरिदास वाघमारे (रा. शिरला अंधारे) हा फरार झाल्याचे सांगण्यात आले.

Sudhakar Bharsakale : अमरावती जिल्ह्यातील काँग्रेसचा हा शिलेदार शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर

कारवाईदरम्यान ‘धूम-२’ या नावाची ९९ पाकिटे, ‘चॅम्पियन-५’ची १०० पाकिटे तसेच ‘पिंकगार्ड ४ २०:२०’ (गोल्डन स्टिकरवरील पिंक रक्षक ५ जी) या प्रकारातील २५० पाकिटे जप्त करण्यात आली. याशिवाय वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले ईको वाहनही जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ४ लाख ५८ हजार रुपये असल्याचे कृषी विभागाने सांगितले.

संग्रामपूर पंचायत समितीचे कृषी अधिकारी तथा बियाणे निरीक्षक रविकिरण नायकार यांच्या तक्रारीवरून तामगाव पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३३६ (४), ३ (५) तसेच बियाणे अधिनियम, पर्यावरण संरक्षण अधिनियम, अत्यावश्यक वस्तू अधिनियम आणि संबंधित नियमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जीवन सोनवणे करीत आहेत.

error: Content is protected !!