व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Jaljiwan Mission : जलजीवन मिशनमध्ये अनियमितता; क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा ठिय्या आंदोलन

Jaljiwan Mission : जलजीवन मिशनमध्ये अनियमितता; क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा ठिय्या आंदोलन

Irregularities alleged in the Jal Jeevan Mission; Krantikari Shetkari Sanghatana stages a sit-in protest : दूषित पाणीपुरवठा विरोधात मेहकर पंचायत समितीसमोर ग्रामस्थ आक्रमक; चौकशीची मागणी

Mehkar जनुना व चिंचाळा गट ग्रामपंचायत अंतर्गत राबविण्यात आलेल्या जलजीवन मिशन व ग्रामीण पाणीपुरवठा योजनेतील कथित अनियमितता, दूषित पाणीपुरवठा, अपूर्ण कामे, वितरण व्यवस्थेतील भेदभाव तसेच संभाव्य आर्थिक गैरव्यवहाराच्या निषेधार्थ क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने पंचायत समिती मेहकर कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर प्रकाश टाले यांनी केले.

या आंदोलनात जनुना व चिंचाळा येथील मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात आलेल्या कामांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.

यावेळी बोलताना डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी आरोप केला की, गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून जनुना व चिंचाळा येथील नागरिकांना नळाद्वारे दूषित, गढूळ व अस्वच्छ पाणीपुरवठा केला जात आहे. याबाबत ग्रामपंचायत, संबंधित अधिकारी व प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

Sudhakar Bharsakale : अमरावती जिल्ह्यातील काँग्रेसचा हा शिलेदार शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर

तसेच जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात आलेल्या पाईपलाईनच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याचाही आरोप करण्यात आला. अनेक भागांमध्ये पाईपलाईनचे काम अपूर्ण असून काही नागरिकांना आजपर्यंत नियमित पाणीपुरवठा मिळत नसल्याचे सांगण्यात आले. काही भागात मोठ्या क्षमतेच्या तर काही भागात कमी क्षमतेच्या पाईपलाईन टाकून वितरण व्यवस्थेत भेदभाव करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.

याशिवाय मंजूर अंदाजपत्रक आणि प्रत्यक्ष करण्यात आलेल्या कामांमध्ये मोठी तफावत असल्याचा आरोप करत या संपूर्ण प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार अथवा भ्रष्टाचाराची शक्यता नाकारता येत नसल्याचे डॉ. टाले यांनी म्हटले. त्यामुळे संपूर्ण कामाची स्वतंत्र तांत्रिक, आर्थिक व प्रशासकीय चौकशी करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

Rahul Bondre : ‘मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महागाई वाढली’, काँग्रेस नेत्याची टीका

दरम्यान, ठिय्या आंदोलनाची तीव्रता वाढल्यानंतर पंचायत समिती प्रशासन, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व संबंधित कर्मचारी आंदोलनस्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत संबंधित गावांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविणे, कामांची पडताळणी करणे तसेच ग्रामस्थांच्या तक्रारींचा अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

यावेळी डॉ. टाले यांनी इशारा देताना सांगितले की, जनुना व चिंचाळा येथील नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध होईपर्यंत, जलजीवन मिशनच्या कामांची निष्पक्ष चौकशी होईपर्यंत आणि दोषींवर कारवाई होईपर्यंत क्रांतिकारी शेतकरी संघटना आंदोलन अधिक तीव्र करेल. आवश्यक असल्यास जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय आणि संबंधित विभागांवर मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

error: Content is protected !!