parbhani-farmers-protest-dry-drought-declaration-soybean-crop-nanded-highway : आक्रमक शेतकरी रस्त्यावर; महामार्ग रोखला
Parbhani / Amaravati : पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिकांवर संकट ओढावले असून परभणी जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. पावसाअभावी सोयाबीनचे पीक करपून जात असल्याने जिल्ह्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी करत शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. वाळून गेलेले सोयाबीन रस्त्यावर फेकत संतप्त शेतकऱ्यांनी पूर्णा-नांदेड राज्य महामार्गावर रास्ता रोको केला.
यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीला पावसाने चांगली हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, त्यानंतर पावसाने अचानक दडी मारल्याने पिकांना मोठा फटका बसला आहे. विशेषतः सोयाबीन पिकाची अवस्था गंभीर झाली असून अनेक ठिकाणी उभे पीक वाळून गेले आहे. डोळ्यादेखत पीक जळून जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शेतातील वाळलेले सोयाबीन उपटून आणले आणि ते पूर्णा-नांदेड राज्य महामार्गावर टाकून शासनाच्या विरोधात निषेध नोंदवला. “परभणी जिल्ह्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करावा. वाळून गेलेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी मदत द्यावी,” अशी मागणी आंदोलकांनी केली.
रास्ता रोकोमुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांना रस्ता मोकळा करण्याचे आवाहन केले. मात्र, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. त्यामुळे पोलीस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक वाद झाला. परिस्थिती तणावपूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना हटवण्यास सुरुवात केली. यावेळी एका शेतकऱ्याला पोलिसांनी रस्त्यावरून फरपटत नेल्याचा प्रकार घडल्याने आंदोलकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला.
Nitesh Rane : मुस्लिमांच्या कार्यक्रमात हिंदूंना परवानगी नसते मग गरब्यात मुस्लिमांना का?
दरम्यान, अमरावती विभागातही शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयासमोर डेरा आंदोलन करण्यात आले. सरसकट कोरडा दुष्काळ जाहीर करावा, कोणत्याही अटी-शर्ती न ठेवता शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. पावसाअभावी पिकांचे मोठे नुकसान होत असताना शासनाकडून तातडीने ठोस मदत मिळावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
__








