mpsc-paper-leak-bjp-workers-sanjay-raut-demand-dismissal-public-service-commission : ‘वारंवार पेपर फुटत असताना टास्क फोर्स कशासाठी?’ सरकारवर हल्लाबोल
Nagpur : राज्यात वारंवार होणाऱ्या MPSCसह इतर स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटीवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे. राज्यात गेल्या दहा वर्षांपासून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार असून, एवढे मोठे सरकार आणि गृहमंत्री असतानाही वारंवार पेपरफुटीच्या घटना घडत असल्याचा आरोप राऊत यांनी केला. हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले असताना आता सरकारला टास्क फोर्स नेमण्याची वेळ का आली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
NEET असो, MPSC असो किंवा अन्य स्पर्धा परीक्षा; पेपरफुटीच्या रॅकेटमध्ये भाजपचेच कार्यकर्ते सक्रिय असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. पुण्यातील UPSC प्रकरणात अटक करण्यात आलेले लोक भाजपचे कार्यकर्ते असल्याचा दावाही त्यांनी केला. प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांची स्वतंत्र यंत्रणा असताना टास्क फोर्स नेमण्याचा उपयोग काय, असा सवाल करत त्यांनी सध्याचा लोकसेवा आयोग तात्काळ बरखास्त करण्याची मागणी केली.
लोकसेवा आयोग बरखास्त करून सर्वसमावेशक आणि पारदर्शक पद्धतीने नवी भरती प्रक्रिया राबवावी तसेच परीक्षा घेण्यात याव्यात, अशी मागणी राऊत यांनी केली. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या परीक्षांमध्ये वारंवार गैरप्रकार होत असतील, तर त्याची जबाबदारी सरकारने स्वीकारली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.
भाजपच्या कारभारावर टीका करताना संजय राऊत यांनी अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दाही उपस्थित केला. अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिरात सध्या दानपेट्यांच्या रांगा दिसत असून, भाजपच्या राज्यात दानपेट्यांची चोरी होत आहे आणि शाळाही लुटल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. पूर्वी मंदिरातील पुजारी सर्व व्यवस्था पाहत होते; मात्र आता एअर मार्शल आणि मोठमोठ्या अधिकाऱ्यांना CEO म्हणून नियुक्त करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. ‘भाजप सरकारने राम मंदिरालाही सोडले नाही, मग ते विद्यार्थ्यांना तरी काय सोडणार?’ असा सवाल करत राऊत यांनी सरकारवर घणाघाती टीका केली.
Nitesh Rane : मुस्लिमांच्या कार्यक्रमात हिंदूंना परवानगी नसते मग गरब्यात मुस्लिमांना का?
नागपुरातील डीजेच्या नियमावलीवरून भाष्य करताना राऊत यांनी सरकारच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अशीच घटना पश्चिम बंगालमध्ये घडली असती, तर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना हिंदूविरोधी ठरवण्यात आले असते, असे ते म्हणाले. मात्र नागपुरात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालयही याच शहरात आहे. त्यामुळे या प्रश्नावर सरकारलाच जाब विचारला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
डीजेच्या अति आवाजामुळे भूकंप आल्यासारखी परिस्थिती निर्माण होते आणि त्याचा मेंदू, हृदय तसेच आजारी व्यक्तींच्या आरोग्यावर थेट परिणाम होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला. त्यामुळे डीजेच्या आवाजाबाबत संपूर्ण देशभर एकसमान आणि सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे लागू करून त्यांची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षाही राऊत यांनी व्यक्त केली.
Agriculture zone : पालकमंत्र्यांचा हुडकेश्वर – नरसाळा अजूनही ‘कृषी झोन’मध्येच
एकनाथ शिंदे यांच्या गटावरही संजय राऊत यांनी निशाणा साधला. एकनाथ शिंदे यांची स्वतंत्र राजकीय पार्टी नसून तो केवळ एक गट आहे, असा दावा त्यांनी केला. या गटाचे ‘कमांडर इन चीफ’ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह असल्याचे सांगत शिंदे गटाला कधी गोव्यात, तर कधी दिल्लीत अमित शाह यांच्या मागे धावावे लागते, असा टोला त्यांनी लगावला.
भाजप आणि शिंदे गटाची विचारधारा एक होऊ शकते, त्यामुळे अखेर शिंदे गट भाजपमध्येच विलीन झाला पाहिजे, असे राऊत म्हणाले. मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेच्या बाबतीत आपण त्यांच्यापासून पूर्णपणे वेगळे असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. MPSC पेपरफुटी, डीजे नियमावली आणि शिंदे गटाच्या राजकीय भूमिकेवरून संजय राऊत यांनी केलेल्या या वक्तव्यांमुळे नागपूरच्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांना पुन्हा उधाण येण्याची शक्यता आहे.
__








