व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home देश-विदेश Abhijit Deepake : मोदी यांनी कधीतरी विध्यार्थ्यांच्या मनाची बात ऐकावी, नीट पेपरफुटी...

Abhijit Deepake : मोदी यांनी कधीतरी विध्यार्थ्यांच्या मनाची बात ऐकावी, नीट पेपरफुटी आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून अभिजित दीपके कडाडले

Modi Should Listen to Students’ Concerns’: Abhijit Deepake Criticizes Government Over Paper Leak and Job Crisis : २० जूनला दिल्लीतील ‘जंतरमंतर’वर कॉक्रोचचा आंदोलनाचा एल्गार

 

Nagpur : देशाचे पंतप्रधान मोदी रोज वेगवेगळ्या घडामोडींवर ट्वीट करत असतात, मात्र ‘नीट’ (NEET) परीक्षा रद्द झाल्यामुळे आणि पेपर फुटल्यामुळे देशातील पाच निष्पाप विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, यावर त्यांनी साधे एक ट्वीटही केले नाही. पंतप्रधान सतत स्वतःच्या ‘मन की बात’ करतात, पण त्यांनी देशातील विद्यार्थ्यांच्या ‘मनाची बात’ कधीतरी ऐकावी, अशा घणाघाती शब्दांत कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दीपके यांनी केंद्र सरकारवर तीव्र निशाणा साधला आहे.

नीट सारख्या देशातील अत्यंत महत्त्वाच्या परीक्षेचे पेपर लीक होतात, मात्र कोणावरही ठोस जबाबदारी निश्चित केली जात नाही. या मोठ्या घोटाळ्यानंतर सरकारने केवळ काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करून मलमपट्टी केली आहे, त्यांना साधं निलंबित करण्याची हिंमतही दाखवलेली नाही. त्यामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही, असा इशारा देत दीपके यांनी आगामी २० जून रोजी दिल्लीतील जंतरमंतरवर मोठ्या आंदोलनाची घोषणा केली आहे.

Dhanorkar Vs Wadettiwar : चंद्रपुरात वडेट्टीवारांना ‘मोठा झटका’; खासदार धानोरकर गटाने थेट गटनेताच बदलला!

आपल्यावरील कथित मारहाणीचा संदर्भ देत दीपके यांनी देशातील आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीवर बोट ठेवले. ते म्हणाले की, मला ज्याने मारहाण केली त्यावरूनच आपल्या देशात किती भीषण बेरोजगारी आहे हे स्पष्टपणे दिसून येते. आज देशातील तरुण हजार-दोन हजार रुपयांसाठी काहीही करायला तयार आहेत, एवढी वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. जर या युवकांच्या हाताला रोजगार असता, तर पैशांसाठी कोणीही असे कृत्य केले नसते. सरकार सध्या मला हलक्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे, पण या देशात जनतेला हलक्यात घेणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून दिली जाते, असेही ते म्हणाले.

विकासाच्या नावावर भाजप निवडणुका जिंकत असल्याचा दावा करते, पण देशाचा नेमका काय विकास झाला? देशात २०० ‘स्मार्ट सिटी’ करण्याची घोषणा करण्यात आली होती, सरकारने एक तरी शहर पूर्णपणे स्मार्ट करून दाखवावे. गेल्या १२ वर्षांपासून फक्त बुलेट ट्रेनच्या घोषणा सुरू आहेत, पण आजतागायत एकही बुलेट ट्रेन धावू शकलेली नाही. स्वच्छ भारत अभियानाचे केवळ मोठमोठे इव्हेंट केले गेले, पण प्रत्यक्षात किती शहरे स्वच्छ झाली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Telegram ban : नीट फेरपरीक्षेपूर्वी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; टेलिग्रामवर तात्पुरती बंदी

सध्या देशात केवळ एकाच पक्षाचा फायदा करून दिला जात असल्याचा आरोप करत ते म्हणाले की, हे सरकार केवळ विरोधी पक्षच तोडत नाही, तर थेट ‘व्होट चोरी’ करत आहे. ज्या ज्या राज्यात मतदार यादी सुधारणा कार्यक्रम राबवला जात आहे तिथे फक्त भाजपलाच कसा काय फायदा होतो, अशी शंका त्यांनी व्यक्त केली. माझा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही, मात्र देशातील लोकशाही वाचली पाहिजे हीच आमची प्रामाणिक भूमिका आहे. आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांच्या विचारांना समोर ठेवून हे आंदोलन करत आहोत. ब्रिटीश सरकारप्रमाणे हे सरकार आम्हाला दडपशाहीने जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करत आहे, पण आम्ही मागे हटणार नाही, असा निर्धार अभिजित दीपके यांनी व्यक्त केला आहे.

error: Content is protected !!