व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Bhendwal ghatmandni : देशाच्या संरक्षण, आर्थिक स्थितीबाबत तणावाचे संकेत, शेतकऱ्यांसाठी मिश्र वर्ष...

Bhendwal ghatmandni : देशाच्या संरक्षण, आर्थिक स्थितीबाबत तणावाचे संकेत, शेतकऱ्यांसाठी मिश्र वर्ष !

bhendwal-ghatmandni-2026-bhavishyvani-paus-pik-arthik-rajkiya-sthiti : भेंडवळ घटमांडणी नुसार जूनमध्ये मुसळधार पाऊस व महापुराचा इशारा

Bhukdhana: भेंडवळ येथे सुमारे ३७० वर्षांपासून चालत आलेल्या पारंपरिक घटमांडणीद्वारे यंदाच्या वर्षासाठी पाऊस, पीक, अर्थव्यवस्था आणि देशाच्या संरक्षण स्थितीबाबतचे अंदाज जाहीर करण्यात आले आहेत. अक्षय तृतीया निमित्त सूर्यास्तावेळी घटमांडणी करण्यात आली होती, तर आज सूर्योदयाच्या वेळी सूक्ष्म निरीक्षण करून वर्षभराचे भाकीत मांडण्यात आले. या पारंपरिक सोहळ्यासाठी मराठवाडा, खानदेश तसेच मध्य प्रदेशातून हजारो शेतकरी उपस्थित होते.

घटमांडणीच्या निष्कर्षानुसार यंदा पावसाचे स्वरूप असमान राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जून महिन्यात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज असून काही भागांत महापुराची परिस्थिती निर्माण होऊन मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जुलै महिन्यात पाऊस सर्वसाधारण राहील, तर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत पावसाचे प्रमाण कमी राहण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

Paratwada sexual exploitation case : बदनामीमुळे पीडित तरुणी शांत होती, आता सगळच सांगितलं!

शेतीच्या दृष्टीने यंदाचे वर्ष मिश्र स्वरूपाचे राहणार असल्याचे भाकीत आहे. कापूस, तांदूळ, तीळ आणि बाजरी या पिकांचे उत्पादन चांगले होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र ज्वारी, तूर, मूग, उडीद, मटकी, जवस आणि वाटाणा ही पिके सर्वसाधारण राहतील असे सांगण्यात आले आहे. सर्व पिकांवर रोगराईचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचेही संकेत मिळाले आहेत.

देशाच्या राजकीय व संरक्षण क्षेत्राबाबतही काही महत्त्वाचे अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत. देशाचा राजा म्हणजेच पंतप्रधान आपल्या पदावर कायम राहतील, मात्र त्यांच्यावर तणावाचे वातावरण राहील असे भाकीत करण्यात आले आहे. संरक्षण क्षेत्रावर दबाव वाढण्याची शक्यता असून देशाची संरक्षण स्थिती तणावपूर्ण राहू शकते, असे संकेत घटमांडणीतून मिळाले आहेत. आर्थिक स्थितीही फारशी मजबूत राहणार नाही, असे या पारंपरिक अंदाजातून सूचित करण्यात आले आहे.

भेंडवळची घटमांडणी ही पूर्णपणे पारंपरिक पद्धतीवर आधारित आहे. शेतात खड्डा करून त्यात मातीचा घट ठेवला जातो आणि त्यावर विविध धान्ये, खाद्यपदार्थ व नैसर्गिक घटक मांडले जातात. रात्रभर होणाऱ्या बदलांचे पहाटे निरीक्षण करून पाऊस, पीक, अर्थव्यवस्था आणि सामाजिक परिस्थितीबाबत अंदाज व्यक्त केला जातो.

Paratwada Sexual exploitation case : आपसांत भांडू नका, पुरावे असतील तर पोलिसांना द्या, बावनकुळे संतापले

या परंपरेला कोणताही शास्त्रीय आधार नसल्याचे तज्ज्ञांचे मत असले तरी स्थानिक शेतकऱ्यांमध्ये या घटमांडणीबाबत प्रचंड विश्वास आहे. अनेक शेतकरी या अंदाजाच्या आधारे आपल्या पेरणीचे नियोजन करतात. निसर्गाच्या अनिश्चिततेमध्ये ही परंपरा शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत असल्याचेही मानले जाते.

error: Content is protected !!