70% Reservation for Locals in District Bank Recruitment : सहकार विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय; वशिलेबाजीला लगाम लागण्याची अपेक्षा
Buldhana राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या भरती प्रक्रियेत स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सहकार विभागाने घेतला असून नव्या शासन निर्णयानुसार (जीआर) आता ७० टक्के पदे संबंधित जिल्ह्यातील उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याबरोबरच भरती प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप, वशिलेबाजी आणि संचालकांच्या कथित मनमानीला आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
नव्या धोरणानुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये नोकरभरतीचे सूत्र ७०:३० असे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार ७० टक्के पदे स्थानिक उमेदवारांमधून भरली जातील, तर उर्वरित ३० टक्के जागा जिल्ह्याबाहेरील उमेदवारांसाठी खुल्या राहतील. विशेष म्हणजे बाहेरील उमेदवार पुरेशा प्रमाणात उपलब्ध न झाल्यास त्या जागादेखील स्थानिक उमेदवारांमधून भरता येणार असल्याची तरतूद करण्यात आली आहे.
Sanjay Gaikwad : ‘तुटवडा नाही’च्या दाव्याने बुलढाण्यात राजकारण तापले!
या निर्णयामुळे जिल्हा बँकांतील भरती प्रक्रियेत स्थानिक प्रतिनिधींमार्फत होणाऱ्या दबाव राजकारणाला आणि कथित शिफारस संस्कृतीला काही प्रमाणात आळा बसू शकतो, अशी चर्चा सहकार वर्तुळात सुरू आहे. अनेकदा जिल्हा बँकांच्या भरतीवर संचालक मंडळाच्या प्रभावाबाबत आरोप होत असताना शासनाच्या नव्या निर्णयामुळे पारदर्शकतेची अपेक्षा वाढली आहे.
जिल्हा बँकेच्या कामकाजाचा थेट संबंध शेतकरी, सभासद, ग्राहक आणि ठेवीदारांशी असल्याने स्थानिक उमेदवारांना रोजगार मिळाल्यास सेवा अधिक परिणामकारक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक परिस्थिती, भाषा, गावपातळीवरील सहकार रचना आणि शेतकऱ्यांच्या गरजा समजून घेण्यात स्थानिक कर्मचारी अधिक सक्षम ठरू शकतात, असे सहकार क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.
Legislative Election : विधानपरिषदेसाठी भाजपचे उमेदवार ठरले, ९९ टक्के जागावाटप निश्चित
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका या प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांना तसेच इतर सहकारी संस्थांना आर्थिक सहाय्य करणाऱ्या महत्त्वाच्या संस्था मानल्या जातात. शेतकऱ्यांना पीककर्ज, कृषी वित्तपुरवठा आणि ग्रामीण अर्थचक्र गतिमान ठेवण्यात या बँकांची भूमिका निर्णायक असते. गावपातळीवरील अनेक सहकारी संस्थांचे अस्तित्व जिल्हा बँकांच्या आर्थिक स्थितीवर अवलंबून असल्याने या बँकांना सहकार क्षेत्रातील ‘मातृसंस्था’ मानले जाते.
Diesel crisis : मुख्यमंत्र्यांचे दावे खोटे, शेतकरी डिझेलसाठी रात्रंदिवस रांगेत
बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची मुख्य शाखा बुलढाणा शहरात असून जिल्हाभरात सुमारे ५० शाखांचे जाळे आहे. बँकेत मनुष्यबळाची कमतरता असल्याचे सांगितले जात असले, तरी आर्थिक स्थिती अधिक सक्षम झाल्यानंतरच भरतीबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, भविष्यात भरती प्रक्रिया सुरू झाल्यास स्थानिक तरुणांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे चित्र आहे.








