व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Financial irregularities: अकोल्यातील गजानन पतसंस्थेतील कोट्यवधींचा गैरव्यवहार उघड; अध्यक्ष-पुत्र अटकेत, हजारो ठेवीदार...

Financial irregularities: अकोल्यातील गजानन पतसंस्थेतील कोट्यवधींचा गैरव्यवहार उघड; अध्यक्ष-पुत्र अटकेत, हजारो ठेवीदार संकटात

Financial irregularities in gajanan maharaj cooperative society Akola: संस्थेच्या अध्यक्षांना अटक, 8 कोटी 97 लाख रुपयांचा अपहार

Akola अकोला शहरातील श्री गजानन नागरी सहकारी पतसंस्थेत तब्बल 8 कोटी 97 लाख रुपयांच्या अपहाराचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत पतसंस्थेचे अध्यक्ष नारायण आवारे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नंदकिशोर आवारे यांना अटक केली आहे. या प्रकरणामुळे सुमारे अडीच हजार ठेवीदारांचे 25 कोटी रुपयांहून अधिक पैसे अडकले असून, शहरात मोठी खळबळ उडाली आहे. डाबकी रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

गेल्या काही महिन्यांपासून पतसंस्थेतील आर्थिक गैरव्यवहाराबाबत तक्रारी समोर येत होत्या. ठेवीदारांनी वारंवार पैसे परत मागूनही संस्थेकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. विशेष म्हणजे, मागील सहा महिन्यांपासून ठेवीदारांना परतावा देणे पूर्णपणे बंद करण्यात आले होते. त्यामुळे ठेवीदारांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.
अनेक तक्रारी आणि प्राथमिक चौकशीनंतर आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणात हस्तक्षेप केला. तपासादरम्यान संस्थेतील आर्थिक व्यवहारांमध्ये गंभीर अनियमितता आढळून आली. त्यानंतर अध्यक्ष नारायण आवारे आणि त्यांचे पुत्र तथा मुख्य कार्यकारी अधिकारी नंदकिशोर आवारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दोघांनाही अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Nagpur municipal corporation : भाजपचे ‘२४ तास’ पाण्याचे दावे फोल; नागपूर महापालिकेत अनेक वर्षानंतर फुटले मडके!

या पतसंस्थेत नोकरदार, पेन्शनर, कामगार तसेच घरकाम करणाऱ्या महिलांनी आयुष्यभराची बचत गुंतवली होती. ठेवीदारांच्या आरोपानुसार, अपहाराची रक्कम इतरत्र गुंतवण्यात आली असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक फसवणूक झाली आहे.
दरम्यान, श्री गजानन नागरी सहकारी पतसंस्थेच्या अकोल्यात दोन तर तेल्हारा येथे एक शाखा कार्यरत असल्याची माहिती आहे. एप्रिल महिन्यापासून ठेवीदारांना पैसे मिळणे बंद झाल्याने नागरिकांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता. आता आरोपींना अटक झाल्याने ठेवीदारांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी अडकलेली रक्कम परत कधी मिळणार, याबाबतची चिंता कायम आहे.
या प्रकरणामुळे सहकारी पतसंस्थांच्या कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आर्थिक गुन्हे शाखेकडून अधिक सखोल तपास सुरू आहे. तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!