व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Fuel crisis : शेतकरी इंधनासाठी रांगेत; शासनाने ‘हवेतील’ विधाने सोडून वास्तव पाहावे!

Fuel crisis : शेतकरी इंधनासाठी रांगेत; शासनाने ‘हवेतील’ विधाने सोडून वास्तव पाहावे!

Former Minister of State Subodh Saoji writes to Chief Minister Devendra Fadnavis against the fuel shortage : माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे संतप्त सवाल

Dongao राज्यात सुरू असलेल्या डिझेल आणि पेट्रोलच्या तीव्र टंचाईच्या पार्श्वभूमीवर माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खरमरीत पत्र पाठविले आहे. “राज्यात इंधनाचा कोणताही तुटवडा नाही” अशा शासकीय दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, प्रत्यक्षात पेट्रोल पंपांवर लागलेल्या रांगांमधून वास्तव स्पष्ट दिसत असल्याचा आरोप सावजी यांनी केला आहे.

सावजी यांनी पत्रात म्हटले आहे की, मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यात पिकांना योग्य बाजारभाव मिळाला नाही, कर्जमाफीचा प्रश्न प्रलंबित राहिला आणि आर्थिक संकट अधिकच गडद झाले. अशा परिस्थितीत “शेतकरी इंधनाचा साठा करत आहेत” हा शासनाचा दावा शेतकऱ्यांची थट्टा करणारा असल्याची टीका त्यांनी केली. पेट्रोल पंपांवर डिझेल-पेट्रोल उधारीवर मिळत नसताना आर्थिक अडचणीत असलेला शेतकरी साठा कसा करणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Vanchit Bahujan Aghadi : महिला शेतकऱ्यावर ३२ लाखांचा दंड?; वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक

शेतीतील यांत्रिकीकरणामुळे इंधनाची गरज वाढल्याचे अधोरेखित करत सावजी म्हणाले की, पूर्वी बैलजोडीच्या सहाय्याने शेती केली जात होती; मात्र बदलत्या परिस्थितीत बहुतांश शेती आता ट्रॅक्टर, पंप आणि इंधनावर चालणाऱ्या यंत्रसामग्रीवर अवलंबून आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांना पेरणीपूर्व मशागतीसाठी डिझेल अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

शासकीय दावे आणि प्रत्यक्ष परिस्थितीतील तफावत अधोरेखित करत सावजी यांनी सरकारमधील वेगवेगळ्या वक्तव्यांवरही निशाणा साधला. “एकीकडे मुख्यमंत्री इंधनाची कमतरता नसल्याचे सांगतात, तर दुसरीकडे अधिक इंधन वितरणाचे दावे केले जातात; मात्र प्रत्यक्षात पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा दिसत आहेत,” असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. वातानुकूलित कार्यालयांत बसून परिस्थितीचे मूल्यमापन करण्याऐवजी मंत्री व अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पेट्रोल पंपांवर जाऊन पाहणी करावी, असा टोला त्यांनी लगावला.

Shivaji Education Society : श्री शिवाजी शिक्षण संस्थेची निवडणूक रद्द; धर्मादाय उपायुक्तांचा मोठा निर्णय

राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करून पुढील एक-दोन दिवसांत सर्व पेट्रोल पंपांवर शेतकरी व वाहनधारकांना आवश्यकतेनुसार इंधन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी सावजी यांनी केली आहे. अन्यथा, इंधन टंचाई नसल्याचे सांगण्याऐवजी वास्तव स्वीकारून जनतेसमोर स्पष्ट भूमिका मांडावी, असे आव्हानही त्यांनी पत्राद्वारे दिले. या पत्रामुळे जिल्ह्यातील राजकीय व प्रशासकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

error: Content is protected !!