freindship between BJP and congress in Khamgao APMC : बाजार समितीपासून सार्वजनिक कार्यक्रमांपर्यंत; बदलत्या समीकरणांची चाहूल
Khamgao देशात भाजपच्या विरोधात दंड ठोकून उभा असलेला कट्टर विरोधक म्हणून काँग्रेसकडे बघितले जाते. नारी वंदन विधेयकाच्या निमित्ताने काँग्रेसने ते सिद्धही करून दाखवले. पण इकडे स्थानिक राजकारणात काही हे समीकरण चालणार नसल्याचे दिसत आहे. पारंपरिकदृष्ट्या कट्टर विरोधक मानले जाणारे भाजप आणि काँग्रेस यांच्यातील वाढती जवळिक सध्या चांगलीच चर्चेत आहे.
अलीकडील काही घडामोडींमुळे या ‘राजकीय सौहार्दाच्या’ चर्चांना अधिक उधाण आले असून बदलत्या राजकीय समीकरणांची चाहूल लागल्याचे मानले जात आहे. बाजार समितीतील सत्तास्थापनेच्या वेळी भाजपच्या सहकार्याने काँग्रेसला पाठबळ मिळाल्याच्या चर्चांनी या समीकरणाला आधीच अधोरेखित केले होते. त्यानंतर विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दोन्ही पक्षांचे पदाधिकारी एकत्र दिसू लागल्याने या जवळिकीबाबतच्या चर्चा अधिक गडद होत आहेत.
यातच अलीकडे खामगावच्या नगराध्यक्षा अपर्णा फुंडकर यांनी ‘नारीशक्ती वंदन’ अधिनियमासाठी सर्वपक्षीय पाठिंबा मिळविण्याच्या प्रयत्नांत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहाण यांच्या पत्नी व माजी सरपंच राजकुमारी चौहाण यांची भेट घेतली. या भेटीची माहिती त्यांनी सामाजिक माध्यमांवर शेअर केल्याने या घडामोडींना अधिक राजकीय रंग चढला आहे.
एका बाजूला, अशा प्रकारचे सहकार्य हे सकारात्मक व निकोप राजकारणाचे लक्षण मानले जात आहे. विकासाच्या मुद्यांवर पक्षीय भेद बाजूला ठेवून एकत्र येणे ही लोकशाहीची गरज असल्याचे मत काही जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे. मात्र, दुसरीकडे या वाढत्या जवळिकीमागे काही वेगळे राजकीय गणित दडले आहे का, अशी शंका राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. बदलत्या राजकीय समीकरणांचा परिणाम निवडणुकीतील आघाड्या आणि सत्तासमीकरणांवर होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.








