व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Ravi Rana, Pravin pote : भाजपची उमेदवारी तुमच्या सांगण्यावरून मिळते, या थापा...

Ravi Rana, Pravin pote : भाजपची उमेदवारी तुमच्या सांगण्यावरून मिळते, या थापा बंद करा; तिवसा मतदारसंघातील बदलाच्या दाव्यावरून राणांना घेरले

Ravi Rana’s remarks trigger a stir within the Amravati BJP; rajesh Wankhede and Pravin Pote Patil hit back : रवी राणांच्या वक्तव्याने अमरावती भाजपमध्ये खळबळ; वानखडे-पोटे पाटलांचा पलटवार

Amravati :तिवसा मतदारसंघात बदल निश्चित आहे आणि हा बदल मीच करणार’, असे युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांनी केल्यानंतर अमरावतीच्या राजकारणात भाजप विरुद्ध राणा असा संघर्ष उफाळून आला आहे. राणा यांच्या वक्तव्यावर भाजपचे आमदार राजेश वानखडे, प्रवीण पोटे पाटील आणि प्रताप अडसड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन जोरदार पलटवार केला. रवी राणांचे राजकारण म्हणजे ‘नौटंकी आणि बनवाबनवी’ असल्याची टीका वानखडे यांनी केली.

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी आयोजित कार्यक्रमात रवी राणा यांनी तिवसा मतदारसंघातील राजकीय बदलाचे संकेत दिले होते. मागील विधानसभा निवडणुकीत तिवसा मतदारसंघातून रविराज देशमुख यांना उमेदवारी मिळणार होती; मात्र त्यांचे तिकीट कापण्याची भूमिका आपण घेतली होती. आता तिवसा मतदारसंघात बदल निश्चित असून, तो आपणच करणार असल्याचे राणा यांनी म्हटले होते.

Sanjay Raut : शिवसेना कोणाची? ‘न्यायालयावर दबाव आणण्याचा प्रयत्न?’

या वक्तव्यावरून भाजपमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. शुक्रवारी पत्रकार परिषदेत आमदार राजेश वानखडे यांनी राणा यांच्यावर थेट निशाणा साधला. भाजपची उमेदवारी आपल्या सांगण्यावरून मिळते, अशा प्रकारच्या दाव्यांपासून राणांनी दूर राहावे आणि भाजपच्या अंतर्गत राजकारणात लुडबूड करू नये, असे वानखडे म्हणाले. भाजप संघटना कमकुवत करून महायुतीत स्वतःचे राजकीय वजन वाढविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

‘बडनेरा मतदारसंघातील कारनामे जनतेसमोर आणू’, असा इशारा देतानाच विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना पराभूत करण्यासाठी राणांनी काय भूमिका घेतली, याची आठवणही वानखडे यांनी करून दिली. भाजप कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळेच निवडणुकीत मताधिक्य मिळाले असून, त्याचे श्रेय स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न करू नये, असेही त्यांनी सुनावले.

दरम्यान, आमदार प्रवीण पोटे पाटील यांनीही राणा दाम्पत्यावर निशाणा साधला. भाजपला विजय पक्षाचा जनाधार आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे मिळतो. पक्ष नवनीत राणा यांना नेता मानत असेल; मात्र व्यक्तिगत पातळीवर आपण त्यांना नेता मानत नसल्याचे पोटे पाटील यांनी स्पष्ट केले. उमेदवारी आणि पक्षातील पदांबाबत निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते आणि संबंधित समित्या घेतात, असेही त्यांनी सांगितले.

आमदार प्रताप अडसड यांनीही रवी राणा यांच्या वक्तव्याचा निषेध केला. कोणाच्याही सांगण्यावरून भाजपमध्ये उमेदवारी दिली जात नाही आणि पक्षात कोणतीही व्यक्ती पक्षापेक्षा मोठी नाही, असे अडसड यांनी स्पष्ट केले.

Akola Congress : अभय पाटील यांच्या निवासस्थानी काँग्रेस नेत्यांची बैठक; पक्षबदलाच्या चर्चांना पूर्णविराम?

अमरावती ग्रामीण जिल्हाध्यक्षपदावरून रविराज देशमुख यांना हटवून त्यांच्या जागी आमदार प्रताप अडसड यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच शहराध्यक्षपदावर डॉ. नितीन धांडे यांच्या जागी नितीन गुडधे यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, शहराध्यक्षांच्या नियुक्तीला चोवीस तासांतच स्थगिती देण्यात आली, तर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदातील बदल कायम ठेवण्यात आला. या निर्णयामुळे देशमुख समर्थकांमध्ये नाराजी निर्माण झाली. त्यानंतर रवी राणा यांनी देशमुख यांच्या पाठीशी उभे राहत केलेल्या वक्तव्यामुळे भाजपमधील अंतर्गत मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत.

error: Content is protected !!