व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Defence project : देशातील सर्वात मोठ्या क्षेपणास्त्र आणि तोफगोळा प्रकल्पाचे लोकार्पण

Defence project : देशातील सर्वात मोठ्या क्षेपणास्त्र आणि तोफगोळा प्रकल्पाचे लोकार्पण

shirdi-Defence-project-missile-drone-artillery-shell-plant-devendra-fadnavis : साईंच्या शिर्डीत फडणवीसांच्या उपस्थितीत ‘शक्ती’चा स्फोट!

Mumbai : अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी हे आजवर साईबाबांच्या भक्तीमुळे जगभर प्रसिद्ध असलेले धार्मिक तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जात होते. मात्र आता शिर्डीची ओळख केवळ भक्तीपुरती मर्यादित राहणार नसून देशाच्या सुरक्षेसाठी शक्तीचे नवे केंद्र म्हणूनही निर्माण होताना दिसत आहे. शिर्डी एमआयडीसी परिसरात तब्बल २०० एकर जागेवर उभारण्यात आलेल्या भव्य क्षेपणास्त्र संकुल आणि तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचे लोकार्पण मोठ्या दिमाखात पार पडले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक सोहळा पार पडला.

या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा दिवस महाराष्ट्र आणि देशाच्या इतिहासातील महत्त्वाचा क्षण असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ‘आत्मनिर्भर भारत’च्या संदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी आता संरक्षण क्षेत्रात होत असल्याचे त्यांनी नमूद केले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली भारत संरक्षण साहित्य उत्पादनात स्वयंपूर्ण बनत असून आता देश संरक्षण सामग्रीचा मोठा निर्यातदारही बनत असल्याचे फडणवीस म्हणाले.

Mlc election : ‘त्या’ एका जागेसाठी भाजप-शिंदे सेना आमनेसामने; फडणवीसांच्या बैठकीकडे लक्ष

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील युवक गणेश निबे यांनी उभारलेला हा प्रकल्प देशासाठी अभिमानाची बाब आहे. आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी उभा केलेला हा प्रकल्प भारताच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. येथे तयार होणारी संरक्षण सामग्री आणि तंत्रज्ञान हे भारतीय सैन्यदलासाठी मोठी ताकद निर्माण करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या प्रकल्पामध्ये वर्षभर अखंडपणे उत्पादन सुरू राहील, अशी व्यवस्था उभारण्यात आली आहे. १५० ते ३०० किलोमीटर अंतरावर अचूक मारा करू शकणारी अत्याधुनिक क्षेपणास्त्रे येथे तयार केली जाणार आहेत. तसेच देशावर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास सलग ३६० ते ३६५ दिवस सैन्याला दारूगोळा पुरवण्याची क्षमता या एकाच प्रकल्पात असल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय शत्रूच्या हालचालींवर अचूक नजर ठेवणारे आणि लक्ष्यभेदी कारवाई करणारे अत्याधुनिक गाईडेड ड्रोन देखील या प्रकल्पात तयार केले जाणार आहेत.

Buldhana politics : जिल्हा राजकारणाचे ‘पॉवर सेंटर’ बनले जळगाव जामोद

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चा उल्लेख करत आत्मनिर्भर भारताची ताकद अधोरेखित केली. पाकिस्तानकडून सीमेवर पाठवण्यात आलेले अनेक ड्रोन भारतीय सैन्याने हवेतच नष्ट केले होते. त्या कारवाईत भारतीय संरक्षण तंत्रज्ञानाची क्षमता जगासमोर आली असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकल्पामुळे आता अहिल्यानगर जिल्हा संरक्षण उत्पादन क्षेत्रातील मोठे केंद्र म्हणून उदयास येणार असल्याचे संकेतही फडणवीस यांनी दिले. शिर्डीसोबतच नाशिक, पुणे आणि नागपूर येथेही भविष्यात मोठे ‘डिफेन्स कॉरिडॉर’ उभारले जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली. या प्रकल्पांना संरक्षण मंत्रालयाची मंजुरी मिळाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “महाराष्ट्रात जिथे गरज भासेल तिथे सरकार जमीन उपलब्ध करून देईल. संरक्षण क्षेत्रात महाराष्ट्राला देशात अग्रस्थानी आणण्याचा आमचा संकल्प आहे,” असेही फडणवीस म्हणाले.

Water crisis : धरण उशाशी, तरी गावांवर जलसंकट; देऊळगाव राजात पाणीटंचाईवरून प्रशासनावर टीका

दरम्यान, या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई ते शिर्डी असा प्रवास ‘वंदे भारत एक्सप्रेस’ने केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी खाजगी विमान, हेलिकॉप्टर किंवा मोठा ताफा टाळत रेल्वे प्रवासाचा पर्याय निवडला. त्यांच्या या निर्णयाची राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

error: Content is protected !!