Revenue minister chandrashekhar bawankule to visit shegao-chikhli on Monday : महसूल मंत्र्यांसाठी शेगाव-चिखलीत एकही समस्या नाही, विरोधकांचा सूर
Buldhana राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना कुठल्याही जिल्ह्याचा खासगी दौरा करण्याचे पूर्ण अधिकार आहेत. पण त्यांना जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याचा अधिकार नाही. सोमवार, दि. २० एप्रिल रोजी ते शेगाव-चिखली दौऱ्यावर येणार आहेत, पण एकाही नागरी प्रश्नावर बैठक न घेताच खासगी कार्यक्रम आटोपून परत जाणार आहेत. त्यामुळे या भागात एकही समस्या नसावी, असे महसूल मंत्र्यांना वाटत असावे, असा सूर विरोधकांनी लावला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रस्तावित बुलढाणा दौऱ्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होताच जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र, या दौऱ्यामागील नेमका उद्देश काय, यावरच अधिक चर्चा रंगताना दिसत आहे. बावनकुळे सोमवारी शेगाव येथे श्री संत गजानन महाजारांच्या मंदिरात येणार आहेत. तेथे दर्शन घेऊन चिखलीकडे प्रस्थान करणार आहेत. त्यानंतर चिखली येथे एका खासगी कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
Khamgao APMC : काय सांगता! भाजप–काँग्रेसमध्ये ‘जवळीक’ वाढली?
विशेष म्हणजे, या संपूर्ण दौऱ्यात शेतकरी, नागरिक किंवा स्थानिक समस्यांवर कोणतीही बैठक अथवा आढावा बैठक नियोजित नसल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील सध्याची परिस्थिती पाहता पाणीटंचाई, शेतीतील अडचणी, तसेच महसुली विषयांवरील प्रलंबित प्रश्न गंभीर स्वरूपात आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्र्यांचा दौरा या मुद्द्यांवर केंद्रित असेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.
मात्र, प्रत्यक्ष दौऱ्याचे स्वरूप पाहता तो खासगी कार्यक्रमापुरताच मर्यादित असल्याचे चित्र समोर येत आहे. यामुळेच ‘दौरा नेमका कशासाठी?’ हा प्रश्न सध्या राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. विरोधकांकडून या दौऱ्यावर टीका सुरू असून, जनतेच्या प्रश्नांपेक्षा इतर हितसंबंधांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, प्रशासनाकडून किंवा संबंधित यंत्रणांकडून या दौऱ्याबाबत अधिकृत स्पष्टीकरण अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे आगामी काळात या दौऱ्याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.








