Breaking

Mahavikas Aghadi : राजकारणात चाललेय तरी काय ?

12 Election Petitions in High Court by Defeated Candidates : आणखी १२ पराभूत उमेदवारांच्या हायकोर्टात निवडणूक याचिका

नागपूर : विधानसभा निवडणूकीचा निकाल लागून दीड महिना उलटला. आता हळूहळू पराभूत उमेदवार न्यायालयाकडे वळू लागले आहेत. जनतेच्या न्यायालयात पराभव पदरी पडल्यानंतर आता आणखी १२ उमेदवारांनी न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. त्यामुळे राजकारणात नेमके चालले तरी काय असा सवाल उपस्थित होत आहे.

महाविकास आघाडीमधील पराभूत उमेदवार वसंतराव पुरके (काँग्रेस), रमेशचंद्र बंग (राष्ट्रवादी- शरदचंद्र पवार), महेश गणगणे (काँग्रेस), सलील देशमुख (राष्ट्रवादी- शरदचंद्र पवार), जयश्री शेळके (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे), स्वाती वाकेकर (काँग्रेस), राहुल बोंद्रे (काँग्रेस), वीरेंद्र जगताप (काँग्रेस), दुनेश्वर पेठे (राष्ट्रवादी- शरदचंद्र पवार), गोपालदास अग्रवाल (काँग्रेस), दिलीपकुमार सानंदा (काँग्रेस) व साहेबराव कांबळे (काँग्रेस) यांनीदेखील विजयी उमेदवारांविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये निवडणूक याचिका दाखल केल्या आहेत.

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्रात राबविले जाणार ‘ई कॅबीनेट’ !

त्यांच्यापूर्वी दहापेक्षा जास्त उमेदवारांच्या निवडणूक याचिका दाखल झाल्या आहेत. पुरके यांनी अशोक उईके (भाजप), बंग यांनी समीर मेघे (भाजप), गणगणे यांनी प्रकाश भारसाकळे (भाजप), देशमुख यांनी चरणसिंग ठाकूर (भाजप), शेळके यांनी संजय गायकवाड (शिवसेना – एकनाथ शिंदे), वाकेकर यांनी संजय कुटे (भाजप), बोंद्रे यांनी श्वेता महाले (भाजप), जगताप यांनी प्रताप अडसड (भाजपा), पेठे यांनी कृष्णा खोपडे (भाजप), गोपालदास अग्रवाल यांनी विनोद अग्रवाल (भाजप), सानंदा यांनी आकाश फुंडकर (भाजप) तर, कांबळे यांनी किसन वानखेडे (भाजप) यांच्या निवडणुकीला आव्हान दिले आहे.

उईके यांनी राळेगाव, मेघे यांनी हिंगणा, भारसाकळे यांनी अकोट, ठाकूर यांनी काटोल, गायकवाड यांनी बुलडाणा, कुटे यांनी जळगाव-जामोद, महाले यांनी चिखली, अडसड यांनी धामणगाव रेल्वे, खोपडे यांनी नागपूर-पूर्व, विनोद अग्रवाल यांनी गोंदिया, फुंडकर यांनी खामगाव तर, वानखेडे यांनी उमरखेड विधानसभा मतदारसंघामधून विजय मिळविला आहे.

निवडणूक आयोगाने ईव्हीएमद्वारे निवडणूक घेण्यापूर्वी विविध कायदेशीर प्रक्रियेची पूर्तता केली नाही. ईव्हीएमने निवडणूक घ्यायची असल्यास काही निकष देण्यात आले होते. त्याचे पालन झाले नाही. निवडणुकीच्या निकालानंतर पराभूत उमेदवारांनी मागणी केल्यानंतरही सीसीटीव्हीचे फुटेज, फॉर्म नंबर २७ दिले गेले नाही. पाच व्हीव्हीपॅटची फेरमोजणी करण्यास मान्यता आहे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

अनेकांनी याकरिता पैसे भरले. मात्र, व्हीव्हीपॅटची मोजणीसुद्धा केली नाही. यासह विविध दावे याचिकांमध्ये करण्यात आले आहेत. तसेच, या मतदारसंघांमध्ये झालेली निवडणूक रद्द करून नवीन निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी न्यायालयाला करण्यात आली आहे.