Rabi irrigation is affected due to Rohitra burning : रोहित्र जळण्यामुळे रब्बी सिंचनाला बसतोय फटका
Wardha सध्या रब्बी हंगाम सुरू आहे. पीक ओलितासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. मात्र, ऐन हंगामात रोहित्र जळाल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. गत आठ महिन्यांत २४८ रोहित्रे जळाली आहेत. यांपैकी बहुतेक रोहित्राची दुरुस्ती करण्यात आली आहे. अद्याप १० पेक्षा जास्त रोहित्रे अजूनही नादुरुस्त आहेत. असे महावितरणकडून सांगण्यात आले आहे. यामुळे रब्बी सिंचनाला फटका बसतो आहे.
सध्या शेती आणि शेतकरी दोघेही हायटेक झाले आहेत. विहिरीवर स्वयंचलित मोटारी बसविण्यात आल्या आहेत. त्यामुळे एकावेळी या मोटारी सुरू होत असल्याने एकावेळी रोहित्रावर भार वाढतो. परिणामी रोहित्र जळाल्याच्या घटना घडत असल्याचे दिसून येत आहे. गत आठ महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात तब्बल २४८ रोहित्रे जळाल्याच्या घटना घडल्या आहे. त्यापैकी २३४ विद्युत रोहित्र दुरुस्त करण्यात आले आहे.
उर्वरित रोहित्रे दुरुस्तीची काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांची गैरसोय होत आहे. पाण्याची उपलब्धता असतानाही शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नाही. असे चित्र जिल्ह्यातील काही भागांत दिसून येत आहे. महावितरणकडून वीज रोहित्र दुरुस्तीची प्रलंबित असलेली कामे पूर्ण करण्यासाठी साधारण आठवड्याचा कालावधी लागतो.
Nagpur Police : बुलेटच्या सायलेंसरवर पोलिसांनी रोलर फिरवला !
ओलिताचे नियोजन बिघडले
वीज रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढत आहे. एकाच रोहित्रावर अधिकची जोडणी असल्याने रोहित्र सतत जळत असल्याचे सांगण्यात येते. शेतात पाणी उपलब्ध असूनही, शेतीला पाणी देता येत नाही. यंदा पाण्याची उपलब्धता असतानाही ही अडचण आहे. वीज रोहित्र जळाल्याची तक्रार केल्यावर आठवडा-पंधरवडा त्याची दुरुस्ती होत नाही. दुरुस्ती झालीच तर लहान मोठ्या समस्या कायम असतात. त्यामुळे ओलिताचे नियोजन कोलमडले असल्याचा अनुभव शेतकऱ्यांना येत आहे.
२४ तास हेल्पलाइन
महावितरणने शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्याकरिता वर्धा जिल्ह्यासाठी कृषिपंपधारक वीज ग्राहकांसाठी ७८७५७६११०० ही हेल्पलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ग्राहकांनी संबंधित क्रमांकावर फोन किंवा एसएमएस करून तक्रार दाखल करावी. त्यांच्या तक्रारीची तातडीने दखल घेऊन त्यांची समस्या सोडविण्यास महावितरणकडून प्राधान्य देण्यात येणार आहे.