Live concerts of shehnaj akhtar, udit narayan and sukhwinder singh : शहनाज अख्तर, उदित नारायण, सुखविंदर सिंग यांचे कार्यक्रम
Ramtek भजन गायिका शहनाज अख्तर यांच्या आवाजातील संगीतमय कार्यक्रम, रामायण महानाट्य, उदित नारायण यांचा ‘पापा कहते’ है हा खास लाइव्ह इन कॉन्सर्ट. अशा एकाहून एक कार्यक्रमांची मेजवाणी रामटेक पर्यटन व सांस्कृतिक महोत्सवात रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. आजपासून (बुधवार) तीन दिवसीय महोत्सवाला सुरुवात होत आहे.
प्रसिद्ध तीर्थस्थळ आणि पर्यटनाचे आकर्षण असलेल्या रामटेक येथे २२ ते २४ जानेवारी दरम्यान हे कार्यक्रम होत आहेत. पर्यटन व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन बुधवारी सायंकाळी ६ वाजता रामटेक येथील नेहरू मैदानावर होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल, खासदार श्यामकुमार बर्वे आदींची उपस्थिती राहणार आहेत, अशी माहिती अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत तुषार ठोंबरे यांनी ही माहिती दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, पर्यटन विभागाचे उपसंचालक प्रशांत सवाई, रामटेकचे उपविभागीय अधिकारी प्रियेश महाजन, अभिनेता पुनीत इस्सार उपस्थित होते. ‘रामायण, महाभारत खूप वर्षांपूर्वी बनले होते. तीन तासांत संपूर्ण रामायण सांगता येईल, याचा प्रयत्न या महानाट्यात करण्यात आला आहे, असे महानाट्यात रावणाची भूमिका साकारणारे पुनित इस्सार म्हणाले.
पहिला दिवस ‘राममय’
रामटेक पर्यटन व सांस्कृतिक महोत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे. उद्घाटन समारंभापूर्वी ५.३० वाजता सुप्रसिद्ध भजन गायिका शहनाज अख्तर यांचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ७ वाजता ‘रामायण’ हे महानाट्य सादर केले जाणार आहे. प्रसिद्ध अभिनेते पुनीत इस्सार आणि सिद्धांत इस्सार लिखित दिग्दर्शित व निर्मित या संगीतमय महानाट्यात भगवान श्रीरामाची भूमिका सिद्धांत इस्सार करणार आहेत. सीतेची भूमिका शिल्पा रायझादा, रावणाची भूमिका पुनीत इस्सार, हनुमानाची भूमिका विंद दारा सिंग करतील. इतर भूमिकांमध्ये अन्य २५ कलाकार आहेत.
Collectorate of amravati : आश्चर्य! महिला लोकशाही दिनाला एकही तक्रार नाही!
गुरुवारी लाइव्ह इन कॉन्सर्ट
२३ जानेवारी रोजी ‘पापा कहते है’ फेम गायक उदित नारायण यांची ‘लाइव्ह इन कॉन्सर्ट’ आयोजित करण्यात आली आहे. शुक्रवार २४ रोजी ‘छय्या छय्या’ फेम सुप्रसिद्ध गायक सुखविंदर सिंग यांची ‘लाइव्ह इन कॉन्सर्ट’ रामटेकच्या नागरिकांसाठी पर्वणी ठरणार आहे.
या तीन दिवसीय महोत्सवात मुख्य कार्यक्रमांव्यतिरिक्त स्थानिकांसाठी रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, सायकल स्पर्धा, मातीकला स्पर्धा, नौका स्पर्धा, स्केटिंग अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, फूड फेस्टिव्हल, हॉट एअर बलून आणि महिला बचत गटाचे स्टॉल प्रदर्शनही राहणार आहे