A leader like Sudhir Mungantiwar is rare in the country : खासदार राजीव प्रताप रुडी यांचे गौरवोद्गार; जिद्दीनं यश मिळविणारा नेता म्हणून उल्लेख
Chandrapur सुधीर मुनगंटीवार यांच्याशी माझे जुने स्नेह आहे. ते माझे चांगले मित्र आहेत. पण माझ्या तीस वर्षांच्या राजकीय जीवनात, जिद्दीनं आपल्या कामात यश मिळविणारा नेता मी अख्ख्या देशात बघितला नाही, या शब्दांत एअरो क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष खासदार राजीव प्रताप रुडी यांनी माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले.
चंद्रपूर येथील मोरवा विमानतळ येथे फ्लाईंग क्लबच्या उद्घाटनाला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी आमदार मुनगंटीवारही व्यासपीठावर उपस्थित होते. सुरुवातीलाच रुडी यांनी कार्यक्रमाचं निमंत्रण दिल्याबद्दल मुनगंटीवार यांचे आभार मानले. ‘माझे मित्र सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानतो. ते अयोध्येत असताना मला इथे येण्याचे निमंत्रण दिले. मलादेखील एका उत्तम अशा आयोजनात सहभागी झाल्याचा आनंद आहे.’
ते म्हणाले, ‘माझ्या तीस वर्षांच्या राजकीय जीवनात मी खूप लोक बघितले. मी श्रद्धेय अटलजींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारमध्ये मंत्री होतो. अनेक वर्षे लोकप्रतिनिधी आहे. पण सुधीरजींप्रमाणे जिद्दीने यश मिळविणारे कमी लोक बघितले. ते अनेक वर्षांपासून आमदार आहेत, प्रदेशाध्यक्ष होते. राज्यात मंत्री देखील होते. ते विकासाचे आणि चांगल्या कल्पनांचे मानक आहेत.’
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत मुनगंटीवार यांनी त्यांना एक पत्र लिहिले. या पत्रामध्ये देशातील ५० पैकी एक पर्यटन केंद्र म्हणून चंद्रपूरचा समावेश करण्याची मागणी होती. असे काम करणारा भारतात एकही आमदार नाही, असे मी खात्रीने सांगू शकतो. एका आमदारात आवश्यक असलेले सर्व गुण त्यांच्यात आहेत. त्यांनी मोरवा फ्लाईंग क्लबच्या निमित्ताने खूप मोठी सुरुवात केली आहे, असंही खासदार रुडी म्हणाले.
सुधीरजींच्या कामांमुळे मी आधीपासूनच प्रभावित आहे. पण आता त्यांनी फ्लाईंग क्लबसाठी घेतलेला पुढाकार ही खूप मोठी सुरुवात आहे. तुम्ही चंद्रपूरमध्ये यशस्वी झाल्यानंतर राज्यभरात असे क्लब होतील. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत देखील माझं तसं बोलणंसुद्धा झालं आहे. भविष्यात देशातील वैमानिकांचे सर्वांत मोठे प्रशिक्षण केंद्र म्हणून चंद्रपूरचा लौकीक वाढेल, असा विश्वास रुडी यांनी व्यक्त केला.
Sudhir Mungantiwar : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे प्रथमच येणार चंद्रपुरात
मी स्वतः एक वैमानिक आहे. नागपुरवर ज्या विमानातून मी आलो, त्याचा मीच पायलट होतो. आता परत जातानाही मी त्याच भूमिकेत असेल. त्यामुळे एअरो क्लब आणि फ्लाईंग क्लब माझ्या आवडीचे विषय आहेत. पण इथे बसलेल्या महिला, मुली भविष्यात कॅप्टन होऊन चंद्रपूरच्या या क्लबमधून उड्डाण भरतील तेव्हाच माझं यश मान्य केलं जाईल, असंही ते म्हणाले.