Congress MP in love with BJP : पक्षाची वाताहत, पण गडकरींचा कार्यक्रम चुकवत नाहीत
Nagpur काही दिवसांपूर्वी नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या बैठकीला माजी मंत्री सुनील केदार यांच्या कार्यकर्त्यांनी दांडी मारली. त्याची खूप चर्चाही झाली. विधानसभा निवडणुकीनंतर तशीही जिल्ह्यात काँग्रेसची वाताहत झाली आहे. पण ‘केदारांचा माणूस’ म्हणून ओळखले जाणारे रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे यांचे वाढते ‘भाजप प्रेम’ मात्र सध्या चांगलेच चर्चेत आहे.
काँग्रेसच्या कार्यक्रमांना, बैठकांना श्यामकुमार बर्वे यांची उपस्थिती चर्चेता विषय ठरण्याचे कारण नाही. पण खासदार झाल्यापासून बर्वे यांनी गडकरींच्या बैठका आणि कार्यक्रम मात्र मिस होऊ दिले नाहीत, या मागचे गणीत अद्याप कळू शकलेले नाही. अक्षरशः गडकरींनी रविवारी आयोजित केलेल्या आदासा येथील अथर्वशीर्ष पठणालाही बर्वे उपस्थित होते.
श्यामकुमार बर्वे अगदी सकाळपासूनच या कार्यक्रमाला उपस्थित होते. एवढ्या सकाळी हजेरी लावून आपण दक्ष असल्याचे त्यांनी दाखवून दिले. भाजप मंत्र्यांच्या कार्यक्रमाला शिस्तबद्धपणे हजेरी लावण्याचे कारण काय? यामागे नेमके काय शिजत आहे? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. बर्वे यांनी सकाळी अथर्वशीर्ष पठण केले आणि त्यानंतर ते विकासकामांच्या भूमिपूजनालाही उपस्थित होते.
गडकरी यांचे जन्मस्थान असलेल्या धापेवाडा येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन रविवारी झाले. त्यावेळी मतदारसंघाचे खासदार म्हणून काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. त्यामुळे त्यांचे उपस्थित राहणे आश्चर्याचे मानण्याचे कारण नाही. त्यांच्यासोबत उमरेडचे काँग्रेसचे आमदार संजय मेश्रामही sanjay meshram आणि काँग्रेसचे प्रतोद अभिजीत वंजारी abhijeet wanjari देखील उपस्थित होते, हे विशेष.
विधानसभा निवडणुकीपूर्वी जामठा येथील ऑक्सीजन पार्कच्या उद्घाटनालाही श्यामकुमार बर्वे आवर्जून उपस्थित होते. हा परिसर रामटेक लोकसभा मतदारसंघात येतो. त्यामुळे त्यांना निमंत्रण असणे स्वाभाविक होते. पण त्यांच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधले होते.
केदार समर्थकांचा बहिष्कार
काही दिवसांपूर्वी नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाबा आष्टनकर यांनी जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीवर केदार गटाने अघोषित बहिष्कार टाकला. नाागपूर जिल्ह्यात तसेच नागपूर जिल्हा परिषदेवर केदार गटाचे वर्चस्व आहे. यामुळे नागपूर ग्रामीण जिल्हा काँग्रेसमध्ये केदार गटाचे वर्चस्व आहेच. पण तरीही विधानसभा निवडणुकीपासून सुनील केदार पक्षापासून काहीसे फटकून वागत आहे. बाबा आष्टनकर यांच्याकडे जिल्हाध्यक्षांची जबाबदारी आल्याने ते नाराज आहेत, असे कळते.