Breaking

Maharashtra Congress : काँग्रेसचा अंतर्गत वाद टोकाला; एकमेकांना केले जातेय टार्गेट!

 

Congress’s internal dispute at an extreme; Targeting each other : युवक काँग्रेसच्या ६० पदाधिकाऱ्यांना केले पदमुक्त, अंतर्गत विवाद टोकाला

Nagpur महाराष्ट्र काँग्रेस व युवक काँग्रेसमधील नेत्यांचे वाद टोकाला गेले आहेत. एकमेकांच्या समर्थकांना टार्गेट करण्यात येत आहे. योग्य काम न केल्याचा ठपका ठेवत युवक काँग्रेसच्या ६० पदाधिकाऱ्यांची त्यांच्या पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. यात विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी, आमदार विकास ठाकरे यांचे पुत्र केतन ठाकरे यांचादेखील समावेश आहे.

रविवारी संघ मुख्यालयाला घेराव घालण्यासाठी देवडिया भवन येथे बैठक बोलविण्यात आली होती. त्यात अनेक पदाधिकारी पोहोचलेच नाहीत. या आंदोलनाच्या मुद्द्यावर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस मधील वाद समोर आला. त्यातूनच युवक काँग्रेसचे राष्ट्रीय प्रभारी अजय छिकारा यांनी ६० पदाधिकाऱ्यांना पदमुक्त केले. यामुळे काँग्रेसच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. या कारवाईमागे पक्षातील गटबाजी कारणीभूत असल्याची माहिती समोर आली आहे.

प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्याविरोधात पदाधिकारी बोलू लागले आहेत. कुणाल राऊत यांनाच पदावरून दूर करावे. कुणाल राऊत निष्क्रिय आहेत. त्यांनी युवक काँग्रेसची संघटना वाढवण्यासाठी काहीच केलं नाही. असा गंभीर आरोप युवक काँग्रेसमधून पदमुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. आम्ही सुनील केदार आणि विजय वडेट्टीवार यांच्या गटाचे आहोत, म्हणून आमच्या विरोधात कारवाई करण्यात आली’.

आम्ही सुनील केदार आणि विजय वडेट्टीवार यांना आपला नेता मानतो, म्हणून आम्हाला टार्गेट केले, असा आरोपदेखील काहींनी लावला आहे. गेले पाच ते सहा दिवस संघाविरोधात आंदोलनाची तयारी सुरू होती. मात्र स्वतः कुणाल राऊत थायलंडला असल्यामुळे हे आंदोलन वारंवार पुढे ढकलण्यात आलं. त्यामुळे आंदोलन नेमकं केव्हा आहे, या संदर्भात संभ्रम निर्माण झाला. अनेक पदाधिकारी कालच्या आंदोलनात पोहोचले नाही, असे स्पष्टीकरणही पदमुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिले आहे.

जरी युवक काँग्रेस मधील पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करण्याच्या मुद्द्यावरून या विषयाची सुरुवात झाली आहे. तरीही याचा शेवट कदाचित काँग्रेस मधील वरिष्ठ नेत्यांच्या हेवेदाव्यांमध्ये होईल. आणि तो नाना पटोले विरुद्ध वडेट्टीवार आणि सुनील केदार यांच्यापर्यंत पोहोचेल अशीच शक्यता आहे.