300 complaints on municipal helpline in three days : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले होते ‘हेल्पलाईन’चे लोकार्पण
Nagpur नागपूर महानगरपालिका हे नाव निघालं तरी तक्रारींचा पाऊस पडेल, अशी स्थिती असते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काही महिन्यांपूर्वी महापालिकेत जनता दरबार घेतला होता. या उपक्रमाला हजारोंनी गर्दी केली. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महापालिकेशी संबंधित तक्रारींसाठी हेल्पलाईनचे लोकार्पण झाले. त्यावरही तीन दिवसांत तीनशे तक्रारी येऊन पडल्या आहेत.
नागपूर महापालिकेने नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी १५५३०४ हा टोल फ्री सुरू केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते या टोल फ्रीचे लोकार्पण होऊन तीनच दिवस झाले. इतक्या कमी कालावधीत हेल्पलाइनवर तीनशेहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याआधीही महापालिकेने ऑनलाइन तक्रार नोंदणीसाठी तक्रार निवारण पोर्टल आणि ‘माय नागपूर’ ॲप उपलब्ध केले होते. मात्र, सर्वसामान्य नागरिकांसाठी फोनद्वारे तक्रार नोंदविण्याची सुविधा अधिक सोयीस्कर ठरत आहे.
Pravin Togadia : फायरब्रँड प्रवीण तोगडियांचे बॅक टू पॅव्हेलियन?
याकरिता मनपाच्या श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटरमध्ये विशेष चमू कार्यरत आहे. जी नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ लक्ष देत आहे. तीन दिवसांत महापालिकेला ४७९ तक्रारी प्राप्त झाल्या, पैकी तीनशेहून अधिक तक्रारी टोल फ्री क्रमांकावरून प्राप्त झाल्या आहेत. हेल्पलाइन सुरू झाल्याच्या पहिल्या दिवशी विविध प्रकारच्या १९६ तक्रारी आयटी विभागाला प्राप्त झाल्या.
यातील ११४ तक्रारी हेल्पलाइनवरून तर उर्वरित संकेतस्थळ व ॲपद्वारे मिळाल्या. तसेच दुसऱ्या दिवशी १३५ तक्रारी प्राप्त झाल्या. यातील ७१ तक्रारी या हेल्पलाइनवरून प्राप्त झाल्या. प्राप्त झालेल्या तक्रारींमध्ये सर्वाधिक तक्रारी मलनिःसारण वाहिनी तुंबणे, परिसरात कचरा संकलन गाडी न येण्यासह अनधिकृत अतिक्रमण हटविण्याच्या आहेत.
University budget : गेल्यावर्षीचा अर्थसंकल्प तुटीचा, यंदा काय होणार ?
नागरी समस्यांच्या जलद निराकरणाच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या टोल फ्री क्रमांक नागरिकांसाठी सोयीस्कर ठरला असला तरी, या तक्रारींवर वेळेत कारवाई होईल का? हा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. प्राप्त तक्रारींचा वेग वाढत असला तरी त्यावर कितपत वेगाने कारवाई होते यावर टोल फ्री क्रमांकाचे यश आहे.