Breaking

CM Devendra Fadnavis : कबड्डी कबड्डी… एक कोटी!

A prize of Rs 1 crore to athletes who win medals in national and international competitions : मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; अ. भा. कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडा स्पर्धांमध्ये नैपुण्य दाखविणाऱ्या खेळाडूंना शासकीय नोकऱ्यांमध्ये सामावून घेतले जाईल. तसेच या खेळाडूंना १ कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ऑलिम्पिक, आशियाई स्पर्धा, कॉमनवेल्द गेम्स यासारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्रासाठी पदक खेचून आणणाऱ्या खेळाडूंना याचा विशेषत्वाने लाभ होणार आहे.

नागपूर महानगरपालिका आणि लक्ष्यवेध फाउंडेशनच्या वतीने अखिल भारतीय मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा नरेंद्रनगर येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. यावेळी सुप्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी याची प्रमुख उपस्थिती होती. आमदार प्रवीण दटके, खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे, माजी खासदार श्री. अशोक नेते, माजी महापौर संदीप जोशी, माजी आमदार श्री. गिरीश व्यास, माजी नगरसेवक अविनाश ठाकरे, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, मनपा क्रीडा अधिकारी डॉ. पीयूष आंबुलकर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, ‘राज्यात खेळाच्या विकासासाठी पुणे येथे क्रीडा विद्यापीठ तयार केले जात आहे. याशिवाय नागपुरातील मानकापूर विभागीय क्रीडा संकुलाचा त्यादृष्टीने विकास होत आहे. मुख्यमंत्री चषक अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेसाठी वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या खेळाडूंसाठी ही स्पर्धा सार्थक ठरेल.’

यावेळी आंतरराष्ट्रीय ट्रायथलॉन खेळाडू संजना जोशी, बास्केटबॉलपटू सिया देवधर, पॅरा चेस, एशियन पॅरा गेम्समध्ये सहभागी मृणाली पांडे, राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक विजेता राजेश भट, राष्ट्रीय स्पर्धेत रौप्य पदक विजेता रोहन गुरबानी या खेळाडूंना मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी प्रातिनिधिक स्वरुपात धनादेश प्रदान केले.

महाराष्ट्राचे खेळाडू अव्वल
कबड्डी हा पूर्णत: भारतीय खेळ आहे. आधी मातीवर खेळला जाणारा हा खेळ आता मॅटवर खेळला जातो. या खेळात आपल्या देशातील खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकीक केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघाचे प्रदर्शन उत्कृष्ट राहिले आहे. भारतीय कबड्डी संघामध्ये जास्तीत जास्त खेळाडू हे महाराष्ट्र आणि हरियाणाचे असतात. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी राज्याचे नावलौकीक केले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

  • सुरेश भुसारी, संपादक

    संपादक, सत्तावेध

    गेल्या ३० वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. 'लोकसत्ता', लोकमत' व 'सकाळ'सारख्या माध्यम समूहांमध्ये वार्ताहर ते दिल्लीतील विशेष प्रतिनिधी म्हणून वार्तांकन केले आहे. महापालिका, जिल्हा परिषदेसह विधानसभा व संसदेतील वार्तांकनाचा त्यांना अनुभव आहे. राजकीय घडामोडींसह विविध विषयांवर त्यांनी विपूल लेखन केले आहे. नागपुरातील ऐतिहासिक घटनांवर आधारित 'हरवलेलं नागपूर' या त्यांच्या पुस्तकाला विदर्भ साहित्य संघाचा उत्कृष्ट ग्रंथलेखनाचा पुरस्कार मिळाला आहे.