Buldhana district moving towards transformation : पालकमंत्री मकरंद पाटील यांनी व्यक्त केला विश्वास
Buldhana बुलढाणा जिल्हा हा भक्ती-शक्तीचा सुरेख संगम आहे. जिल्ह्यातील कृषी, उद्योग, आरोग्य, शिक्षण, पर्यटन, पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रातील विकासातून जिल्ह्याची परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. या सर्वांगीण विकासाच्या वाटचालीत बुलढाणा जिल्हा आता थांबणार नाही, यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी केले.
76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस कवायत मैदानात पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. पालकमंत्री म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे DCM Eknath Shinde आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार DCM Ajit Pawar यांच्या नेतृत्वात आता बुलढाणा जिल्ह्याच्याही विकासाला नक्कीच गती मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीच्या पहिल्या शंभर दिवसांचा आराखडा तयार केला आहे. त्यानुसार राज्य सरकार काम करणार आहे. यात बुलढाण्याचे मोलाचे योगदान राहील.
बुलढाणा हे विदर्भाचे प्रवेशद्वार आहे. भक्ती-शक्तीचा सुरेख संगम आहे. स्वराज्याचे आजोळ आणि आधुनिक संत विचारांचे माहेरघर आहे. शूर सरदार लखोजी जाधवराव यांच्या घरात स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ आई साहेबांचा जन्म सिंदखेडराजा या ऐतिहासिक गावी झाला असून हे मातृतीर्थ आपल्यासाठी प्रेरणास्त्रोत आहे, असंही ते म्हणाले.
Minister Akash Fundkar : सर्वसमावेशक विकासाच्या प्रक्रियेला गती
शेतकऱ्यांच्या परिश्रमामुळे गेल्या हंगामात जिल्ह्याची सोयाबीनची उत्पादकता देशाच्या सरासरीपेक्षा अधिक राहिली आहे. बदलत्या वातावरणामुळे शेतीवर होणाऱ्या विपरीत परिणामावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करण्याची गरज आहे. ही गरज ओळखून जिल्ह्यात या चालू वर्षात 14 हजार हेक्टर क्षेत्रात संत्रा, मोसंबी, सीताफळ, केळी, पेरू, आंबा या फळपिकांची लागवड करण्यात आली आहे, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
सेंद्रिय शेतीचे क्षेत्रही वाढत आहे. आता आठ हजार हेक्टरपर्यंत पोहोचले आहे. आगामी काळात भाजीपाला, तेलबिया आणि बियाणे उत्पादन केंद्र विकसित करण्यावर भर दिला जात आहे. तसेच बियाणे उत्पादनात शेतकऱ्यांनी दिलेल्या योगदानामुळे सोयाबीन बियाण्यांच्या उत्पादनात जिल्हा अव्वल राहिला आहे, असंही ते म्हणाले.
यंदाच्या आर्थिक वर्षाच्या खरीप हंगामामध्ये सुमारे सात लाख पस्तीस हजारपेक्षा जास्त तर रब्बी हंगामामध्ये सव्वा तीन लाखांपेक्षा जास्त हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यावर्षी एक लाख बारा हजार हेक्टर क्षेत्रावर निर्मित सिंचन क्षमता निर्माण करण्याचे नियोजन आहे. सूक्ष्म सिंचन योजनेंतर्गत पंचाहत्तर हजार हेक्टरपर्यंत सिंचन क्षेत्रामध्ये वाढ झालेली आहे, असंही मंत्री पाटील म्हणाले.
गेल्यावर्षी खरीप हंगामावर अतिवृष्टीमुळे काही तालुक्यातील पिकांवर संकट आले. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात आले. प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत सन 2023-24 मध्ये खरीप व रब्बी हंगामातील 497 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. अवेळी पाऊस अतिवृष्टी पूर, आणि दुष्काळ बाधित नऊ लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत 815 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मदत व पुनर्वसन विभागामार्फत देण्यात आलेली आहे. या मदतीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी शासन पुरेपूर प्रयत्न करीत आहे, असा विश्वास त्यांनी शेतकऱ्यांना दिला.