Abhinandan Sohla by Vishwa Varkari Seva Sanstha : विश्व वारकरी सेवा संस्थेतर्फे अभिनंदन सोहळा
Varkari Seva Sanstha : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत. आपण कोणत्या व्यासपीठावर आहोत. आपल्याला कोणता विषय मांडायचा आहे, याचे पूर्ण भान असलेले नेते म्हणून ते लोकप्रिय आहेत. शुक्रवारी (3 जानेवारी) त्यांनी एका कार्यक्रमात केलेले भाषण प्रवचनापेक्षा वेगळे नव्हते. संतांचे विचार, त्यांची सुभाषितं, संस्कृत सुभाषितं, त्यांचा मराठीतील अनुवाद असा अफलातून धागा गडकरींनी जोडला. ‘मी प्रवचनकार नाही’, असं गडकरी म्हणाले, पण त्यांच्या भाषणाने वारकरी मात्र भारावले.
विश्व वारकरी सेवा संस्थेच्या वतीने नागपुरात Nagpur अभिनंदन सोहळा आयोजित करण्यात आला. त्यावेळी गडकरी बोलत होते. विश्व वारकरी सेवा संस्थेचे संदीप काळे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात बोलताना गडकरींच्या मुखातून निघालेले शब्द जसेच्या तसे…
गडकरी उवाच :
1.
‘महासागरातील प्रत्येक थेंब महत्त्वाचा असतो. तसेच अंधःकार नाहीसा करण्यासाठी एक छोटासा दीप महत्त्वाचा असतो. सूर्याचा आणि चंद्राचा अस्त होईल, तारे लोप पावतील. सगळीकडे अंधःकार होईल. अशावेळी दीप म्हणतो की, मी जळत राहील. किती उजेड देऊ शकेन, हे माहिती नाही; पण अंधःकार दूर करण्याचा माझा प्रयत्न अखेरपर्यंत सुरू राहील. संतांचे विचार, त्यांनी दिलेले संस्कार भक्तीमार्गाच्या माध्यमातून भविष्याच्या पिढीपर्यंत पोहोचावेत, असा उद्देश आहे. सुसंस्कृत समाज निर्माण करण्यासाठी संतांचा प्रत्येक विचार अंधःकार नाहीसा करणाऱ्या तेजस्वी पणतीप्रमाणे आहे.
2.
‘जे का रंजलें गांजले, त्यासी म्हणे जो आपुले… तोचि साधु ओळखावा, देव तेथेंचि जाणावा’. माझी आई मला नेहमी संत तुकाराम महाराजांचा हा अभंग सांगायची. संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे : ‘आकाशात् पतितं तोयं, यथा गच्छति सागरम् । सर्वदेवनमस्कार: केशवं प्रति गच्छति ||’. ‘पडे खालती जे नभातून पाणी… जसे सागरा तेच जाते मिळोनी; नमस्कार कोणाही देवास केला… तरीं अंती तो पोचतो केशवाला’ असा या संस्कृत सुभाषिताचा मराठी अनुवाद आहे.
Local Body Elections : 22 जानेवारीच्या निकालाकडे इच्छुकांचे लक्ष!
3.
स्वामी विवेकानंदांनी शिकागोच्या भाषणात हेच सांगितले आहे. ‘माझा धर्म किंवा परमेश्वर श्रेष्ठ आहे, हे सांगायला मी इथे आलेलो नाही. कारण तुमची ज्या धर्मावर, परमेश्वरावर श्रद्धा असेल, त्याची भक्ती करून शेवटी आपण एकाच ठिकाणावर पोहोचणार आहोत,’ असा विचार स्वामी विवेकानंदांनी मांडला.
4.
भक्तीरसाचा संस्कार समाजात निर्माण झाला तर समाजात गुणात्मक बदल होईल. आपण चांगल्या विचारांच्या सहवासात असलो तर चांगली प्रेरणा मिळते. संत गोरा कुंभार, चोखामेळा, गजानन महाराज, तुकडोजी महाराजांची आपण जात विचारत नाही. कारण माणूस त्याच्या जातीने नव्हे तर गुणांनी श्रेष्ठ असतो. त्यामुळे जे चांगले आहे ते स्वीकारण्याची भूमिका असली पाहिजे.
5.
महाराष्ट्राची संस्कृती संतांच्या वाङ्मयाशी जुळलेली आहे. संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज, गजानन महाराज, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज आदी संतांनी जीवन कसे जगावे, याचा संदेश दिला. सुसंस्कृत समाज निर्माण होण्यासाठी संतांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे. त्यासाठी भविष्यातील पिढीमध्ये संतांचे विचार रुजविण्याचे कार्य आपल्याला करायचे आहे. त्यातून समाज उभा होईल आणि राष्ट्रनिर्माणाचे उद्दिष्ट साध्य होईल.