In a year, 25 bodies were cremated by the administration : बेवारस मृतदेहांचा प्रश्न सोडविण्याचे आव्हान कायम
Wardha जिल्ह्यातील इतर समस्यांचाच प्रश्न निकाली लागत नाही. त्यात आता प्रशासनापुढे बेवारस मृतदेहांचा संवेदनशील विषयदेखील येऊन उभा आहे. गेल्या वर्षभरात जिल्हा प्रशासन व पोलिसांनी मिळून २५ बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. अखेरच्या प्रसंगाला ज्याचा कुणी वाली नाही, त्याच्यासाठी प्रशासन धावून आले. कोरोनाच्या काळात संपूर्ण जगाने ज्या परिस्थितीचा अनुभव घेतला, ते चित्र प्रशासनासाठी नवे नाही, असेच म्हणावे लागेल.
सर्वाधिक मृतदेह पन्नासपेक्षा अधिक वयोगटातील आहेत, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. अनेकांचा मृत्यू गंभीर आजारपण, वृद्धत्वाने झाला असल्याची माहिती शवविच्छेदन अहवालातून पुढे आली आहे. शहरासह ग्रामीण भागात गेल्या वर्षभरात २५ बेवारस मृतदेह आढळून आले. त्यांची ओळख न पटल्याने मृतदेहांवर पोलिस आणि स्थानिक प्रशासनानेच अंत्यसंस्कार केले.
Nagpur BJP : प्रत्येक बुथवर दीडशे कार्यकर्त्यांच्या नोंदणीचे टार्गेट !
घर सोडून जाणारे, भीक मागणारे, रेल्वेखाली येऊन जीव गमावणारे अशा अनेकांचा यामध्ये समावेश आहे. यात काही महिलादेखील आहेत. सुरुवातीला रुग्णालयातील पोलिसांकडे आकस्मिक मृत्यूची नोंद होते. मृतदेह सापडलेले ठिकाण कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे, हे तपासले जाते. त्यानंतर मरणोत्तर पंचनामा होतो. ओळख पटविण्यासाठी पोलीस जंग पछाडतात. कागदपत्र, फोटो आदींच्या माध्यमातून मृताच्या नातेवाईकांचा शोध घेतला जातो. त्यानंतर घटनेपासून शवविच्छेदनापर्यंतचा संपूर्ण अहवाल सादर केला जातो. त्यानंतरच पुढील कार्यवाही केली जाते.
तरच बेवारस ठरवले जाते
बेवारस मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी पोलिस आकस्मिक मृत्यू दाखल करून तपास केला जातो. बेपत्ता व्यक्तींच्या संपर्कातील नातलगांशी संपर्क साधला जातो. मृताच्या फोटोसह कागदपत्रांद्वारे माहिती मिळवून ओळख पटविण्यात येते. ज्यांची ओळख पटत नाही, त्यांना बेवारस ठरविले जाते. त्यानंतर त्यांच्यावर प्रशासनामार्फत अंत्यसंस्कार केले जातात.
भयावह वास्तव
उत्तम आयुष्याची अपेक्षा प्रत्येकाला असते. पण किरकोळ कारणावरून बिनसते आणि अनेक जण घर सोडून जातात. यातील अनेक जण भीक मागून जगतात. मात्र, अनेकांची मानसिकता खालावून त्यांना भीक मागणेही शक्य होत नाही. जागा मिळेल तेथे राहतात. अनेकांना विविध आजारांची लागण होते. त्यातच अन्न, पाणी व उपचाराविना त्यांचा मृत्यू होतो, हे आपल्या समाजातील भयावह वास्तव आहे.