Minister of state on surprise visit to school : राज्यमंत्री अचानक पोहोचले शाळेत, विद्यार्थ्यांशी साधला संवाद
Wardha राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आज शनिवारी जिल्हा परिषदेच्या महात्मा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. अभ्यासक्रम किती झाला, शिक्षक व्यवस्थित शिकवितात का, आपण कोणत्या भागातून येतात, आदी माहिती घेतली.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, शिक्षणाधिकारी मनीषा भडंग, शिक्षण विभागाचे अधीक्षक ज्ञानेश्वर जवादे, मुख्याध्यापक आदी उपस्थित होते.
राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सकाळी ११ वाजता बसस्थानकाजवळील महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाला भेट दिली. थेट वर्गात पोहोचताच त्यांच्यातील शिक्षक जागा झाला. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून प्रश्नोत्तराच्या माध्यमातून अभ्यासक्रम जाणून घेतला. याशिवाय ग्रामीण भागातील विद्यार्थी असल्याचे लक्षात येताच ते कशाने शाळेत येतात, बसची सुविधा उपलब्ध आहे का, याबद्दलही विचारणा केली.
Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांसाठी पुन्हा सोडला गुंडावारांनी ‘तोच’ संकल्प !
शाळेतील घोडाम व कोहाड नामक विद्यार्थ्यांनी राज्यमंत्र्यांसमोर शाळेतील समस्यांबाबत माहिती दिली. ग्रंथालय, अभ्यासिका, प्रसाधनगृह, सुरक्षा रक्षक, क्रीडांगण व कॉलेजच्या इमारतीमध्ये सुधारणा करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी यावेळी केली. तेव्हा ना. डॉ. भोयर यांनी या समस्या सोडविण्यासंदर्भात शिक्षण विभागाला सूचना केल्यात.
मुख्याध्यापक यांनी कनिष्ठ महाविद्यालयात यावर्षी ११ वी विज्ञानला २० व १२ वी विज्ञानला ३० असे एकूण ५० विद्यार्थी प्रवेशित असल्याची माहिती दिली. महाविद्यालयासाठी १० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जागा मंजूर आहेत. यामध्ये शिक्षकांच्या सहा जागा मंजूर आहेत. सद्य:स्थितीत तीन पूर्णकालीन शिक्षक कार्यरत आहेत. तीन शिक्षकांची अस्थाई स्वरूपात नियुक्ती करण्यात आल्याचे सांगितले.
Mahayuti Government: मोठी बातमी! एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार?
राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी शाळेची पाहणी केली. इमारत जीर्ण झाली असून विद्यार्थ्यांनीही इमारतीबाबत तक्रार केली आहे. इमारत धोकादायक स्थितीत असल्याने भविष्यात मोठी दुर्घटना होऊ शकते. त्यापूर्वीच याबाबत काळजी घेणे आवश्यक असल्याने तिचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे, असे आदेश दिले. इमारत धोकादायक आढळून आल्यास येथील विद्यार्थ्यांना सुरक्षित जागेवर स्थलांतरित करण्यात यावे, अशी सूचना केली.