Calculation of the catchment area of Futala Lake has started : फुटाळा तलाव व पाणलोट क्षेत्राच्या मोजणीला सुरुवात
Nagpur महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कठोर भूमिका घेतल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे. तब्बल शंभर वर्षांनंतर पहिल्यांदाच फुटाळा तलाव क्षेत्राची (मौजा तेलंगखेडी) मोजणी सुरू झाली आहे. भूमी अभिलेख विभागाच्या (सिटी सर्व्हे कार्यालय क्रमांक ३) पथकाद्वारे सोमवारी या मोजणीला सुरुवात झाली.
तलावाच्या काही पाणलोट क्षेत्राची (कॅचमेंट एरिया) देखील मोजणी केली जाणार आहे. मोजणीच्या निष्कर्षांनुसार, अतिक्रमण हटवून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (माफसू) या सरकारी जागेचा ताबा घेईल. अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.
Chandrashekhar bawankule : पालकमंत्र्यांच्या घरासमोर ऑटोचालकांना लुटले
तलावाची नोंद मौजा तेलंगखेडी, खसरा क्रमांक १८ येथे असून, तो सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावावर ५७.३० एकर क्षेत्रात आहे. तसेच, तलावाच्या उत्तर दिशेतील पाणलोट क्षेत्र (खसरा क्रमांक १९ आणि २०) ६.१२ एकर आहे. ते माफसूच्या मालकीचे आहे. एकूण ६३.४२ एकर क्षेत्रफळाचे मोजमाप करण्यात येणार आहे.
अन्याय निवारण मंचाच्या अध्यक्ष ज्वाला जांबुवंतराव धोटे यांनी २०२२ पासून सातत्याने तक्रारी दाखल केल्या आहेत. माजी नगरसेवक कमलेश चौधरी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बेकायदेशीर बांधकामे केल्याचा त्यांचा आरोप आहे. तक्रारीनुसार, तलावाचा काही भाग आणि पाणलोट क्षेत्र माती टाकून भरून लॉन विकसित करण्यात आले. चौधरी कुटुंबाने २०२२ मध्ये पाणलोट क्षेत्रात पहिली निवासी इमारत बांधली. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी त्याला लागून आणखी एक इमारत उभारली.
Chandrashekhar Bawankule : कारवाईसाठी मी स्वतः प्रयत्न करेन !
पश्चिम नागपूरचे आमदार आणि नागपूर जिल्हा (शहर) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी हा मुद्दा उचलला व पालकमंत्र्यांकडे तक्रार केली होती. १२ फेब्रुवारी २०२५ रोजी झालेल्या बैठकीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर महानगरपालिका, माफसू आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना फटकारले. तीन दिवसांत लॉन हटवून तलाव मूळ स्वरूपात आणण्याचे तसेच पाणलोट क्षेत्राचा ताबा परत घेण्याचे आदेश दिले.
बावनकुळे यांच्या आदेशानंतर, सार्वजनिक बांधकाम विभागाने तलावाच्या मोजमापासाठी सिटी सर्व्हे कार्यालयाकडे अर्ज केला आहे, तर माफसूने पाणलोट क्षेत्राच्या मोजणीची मागणी केली. माफसूच्या तक्रारीवरून, गिट्टीखदान पोलिसांनी कमलेश चौधरी, त्यांची आई मीना चौधरी आणि लहान भाऊ मुकेश यांच्या विरोधात अगोदरच गुन्हा नोंदवला आहे.