Inquire the work of Jaljeevan Mission : हिवरा खुर्द येथील क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा इशारा
Buldhana मेहकर तालुक्यातील हिवरा खुर्द येथे जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर असलेल्या पाणीपुरवठा योजनेतील कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप खरण्यात आला आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेने संबंधित अधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदन दिले आहे. आठवड्याभरात चौकशी झाली नाही तर धरणाच्या विहिरीत जलसमाधी आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
हिवरा खुर्द गावासाठी १ कोटी ७२ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. ही योजना २०२१ ते २०२३ दरम्यान पूर्ण होणे अपेक्षित होती. मात्र, २०२४ पर्यंत काम अपूर्ण राहिले आहे. कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. प्रत्यक्ष पाहणी दरम्यान अनेक ठिकाणी जुन्या पाईपद्वारेच पाणीपुरवठा सुरू असल्याचे दिसून आले. तसेच, योजनेत दर्शविलेल्या विहिरीऐवजी स्थळ बदलून ‘पेन टाकळी’ धरणाच्या ठिकाणी विहीर घेण्यात आली आहे.
MLA Siddharth Kharat : जलजीवन मिशन योजनेत गैरप्रकार, विधानसभेत गाजला विषय
त्यामुळे धरणातील दूषित पाणी गावात पोहोचत असून, ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या संपूर्ण योजनेमध्ये ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. त्यामुळे ही चौकशी गावकऱ्यांच्या समोर पारदर्शक पद्धतीने, मूळ अंदाजपत्रकानुसार करण्यात यावी, दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
संघटनेच्या निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, “जर आठवड्याभरात निवेदनाची दखल घेऊन चौकशी सुरू झाली नाही, तर आम्ही गावकऱ्यांना सोबत घेऊन पेन टाकळी धरणाच्या विहिरीत जलसमाधी आंदोलन करू.” यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अमोल मोरे, कैलास उतपुरे, निलेश गवळी, सुरेश खरात, प्रवीण उतपुरे, निलेश राजपूत, विष्णू पवार, अनंथा गाडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.