Guardianship of Buldhana, Washim towards Western Maharashtra : मकरंद जाधव पाटील, हसन मुश्रीफ यांच्याकडे जबाबदारी
Buldhana विदर्भातील बुलढाणा आणि वाशीम या दोन्ही महत्त्वाच्या जिल्ह्यांचे पालकत्व पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांकडे सोपविण्यात आले आहे. बुलढाण्याची जबाबदारी मकरंद जाधव पाटील यांच्याकडे, तर वाशीमची जबाबदारी हसन मुश्रीफ यांच्याकडे देण्यात आली आहे. विशेष म्हणजे दोघेही राष्ट्रवादीचे नेते आहेत. पाटील हे साताऱ्याचे तर मुश्रीफ हे कोल्हापूरचे रहिवासी आहेत. त्यामुळे विदर्भातील महत्त्वाच्या जिल्ह्यांचे प्रश्न ते कसे सोडवतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असेल.
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांची बुलढाण्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे हे नेते आहेत. पालकमंत्र्यांची नियुक्ती झाल्यामुळे जिल्ह्यातील विविध शासकीय कामांना गती मिळण्याची अपेक्षा आहे. खासकरून जिल्हा नियोजन समितीच्या कामांना वेग मिळेल. त्या समितीतील निधी योग्य ठिकाणी खर्च होईल. यामुळे तालुकास्तरावर विविध शासकीय समित्यांवरील सदस्यांची नियुक्तीही लवकर होऊ शकेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
महायुतीतील पक्षांनी पालकमंत्र्यांची नियुक्ती करताना समतोल साधला आहे. शिंदेसेनेचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि भाजपचे अॅड. आकाश फुंडकर हे राज्याचे कामगार मंत्री आहेत. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्ह्यात महत्त्वाचे पद मिळाले आहे. अजित पवार गटाने पालकमंत्री पद स्वीकारले आहे, ज्यामुळे सत्तेचा समतोल साधला गेला आहे, असे बोलले जात आहे. यामुळे जिल्ह्यातील रखडलेले प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल. शासकीय योजनांना कार्यान्वित करण्यास गती मिळेल, हे मात्र निश्चित.
वाशीम जिल्ह्याला पालकमंत्री मिळाल्यामुळे जिल्ह्याच्या विविध शासकीय योजनांच्या कार्यान्वयनास गती मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे. पालकमंत्री नसल्यामुळे गेल्या दीड महिन्यांपासून जिल्हा नियोजन समितीच्या कामांमध्ये अडचणी आल्या होत्या. जिल्ह्याला प्राप्त झालेल्या ११२ कोटी ८० लाख रुपयांच्या वार्षिक निधीतील अल्प प्रमाणातच खर्च झाला आहे. ३१ मार्चपूर्वी या निधीचा योग्य वापर कसा होईल, याबाबत चिंताही व्यक्त केली जात होती.
हसन मुश्रीफ यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यामुळे जिल्ह्याच्या विविध योजनांवर लवकरच काम सुरू होईल. जिल्हा नियोजन समितीचा निधी योग्य ठिकाणी वापरणे, अंगणवाडी बांधकाम प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता, तसेच जिल्ह्यातील इतर रखडलेले प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा आहे. यामुळे जिल्ह्यातील विकास कामांना गती मिळून, शासकीय योजना पूर्णत्वास जाऊ शकतील, असा विश्वास स्थानिकांना आहे.
Nitin Gadkari : विदर्भाला संत्रा प्रक्रिया उद्योगांची आवश्यकता
संजय राठोड यांच्या नावाची होती चर्चा
वाशीम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी संजय राठोड याची नियुक्ती होणार अशी चर्चा होती. मात्र त्यांना यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाले आहे. शिवाय त्यांच्या नावाला वाशीममधून विरोधदेखील होता.