The corruption in the municipal corporation will soon be exposed : आमदारांनी पत्रकार परिषदेत दिला इशारा, आमदार सावरकर यांच्यावर निशाणा
Akola गेल्या दोन वर्षांपासून अकोला महापालिकेत प्रशासक राज सुरू आहे. या काळात प्रशासनाच्या आडून महापालिकेचा कारभार कोणाच्या मार्गदर्शनाखाली चालतो आहे, हे सर्वश्रुत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेत सुरू असलेल्या गैरव्यवहारांची लवकरच पोलखोल करण्याचा इशारा आमदार साजिद खान पठाण यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला.
यावेळी प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्रकाश तायडे, मो. इरफान, महेंद्र गवई आणि इतर काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमात शहर विकास आणि महापालिकेतील स्थितीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. नगरसेवक आणि विरोधी पक्षनेते म्हणून काम करत असताना महापालिकेच्या विकासासाठी मी प्रयत्नशील होतो, असं ते म्हणाले. पत्रकारांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
आमदार म्हणून पदभार स्वीकारल्यापासून विविध विभागांचा आढावा घेताना अनेक गंभीर प्रकरणे उघड झाली आहेत. महापालिकेत प्रशासक राज सुरू असताना गैरव्यवहारांचे प्रकार वाढले असल्याचा आरोप त्यांनी केला. नुकतेच आकृतीबंधाच्या नावाखाली काही कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी रुजू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. असा खुलासा त्यांनी केला. त्याचवेळी संबंधित कागदपत्रे हाती लागल्याची माहिती दिली. या प्रकाराची सविस्तर चौकशी करून सत्य जनतेसमोर आणले जाईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
महापालिकेतील कारभार नागरिकांच्या हिताला बाधा पोचवत असल्याचे त्यांनी नमूद केले. हे प्रकार थांबवण्यासाठी आवश्यक पावले उचलली जातील, असे आमदार पठाण म्हणाले.
आमदार सावरकर यांच्यावर अप्रत्यक्ष टीका
अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वात अकोला जिल्ह्यात भाजपची पकड मजबूत आहे. गेल्या अडीच वर्षांपासून जिल्ह्याला बाहेरचे पालकमंत्री मिळाले आहेत. त्यामुळे आमदार सावरकर यांचाच प्रशासनावर प्रभाव आहे. ते बघता काँग्रेसचे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील आमदार साजिद खान पठाण यांनी महापालिकेच्या कारभारावरून टीका करणे. हा अप्रत्यक्षपणे आमदार सावरकर यांच्यावरच साधलेला निशाणा आहे.
Chandrashekhar Bawankule : मुख्यमंत्र्यांच्या मामाच्या गावाला जाऊया!
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही दोघांमध्ये जुगलबंदी
साजिद खान पठाण हे प्रथमच आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात अकोला शहरातील समस्या मांडण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना मंत्र्यांनी नव्हे तर आमदार सावरकर यांनी उभे राहून उत्तर दिले होते. त्यावेळी या दोघांमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली होती. आता अकोला शहरातील विकासकामांवरुन या दोघांमध्ये राजकारण पेटण्याची शक्यता आहे.