Breaking

Sudhir Mungantiwar : छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र देशाच्या प्रगतीसाठी मार्गदर्शक !

The biography of Chhatrapati Shivaji Maharaj is a guide for the progress of the country : आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे महाराजांना जयंतीनिमित्त अभिवादन

Chandrapur : छत्रपती शिवाजी महाराजांचे कुशल प्रशासन, त्यांची नियोजनाची शैली, युद्धकलेतील निपुणता आजही प्रत्येक पावलावर मार्गदर्शक ठरत आहेत. शिवाजी महाराजांचे संपूर्ण चरित्र हेच देशाच्या प्रगतीसाठी मार्गदर्शक आहेत, या शब्दांत राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले.

चंद्रपुर, बल्लारपूर, दुर्गापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करण्यात आला. चंद्रपूर येथील गिरनार चौक येथे भाजपा महानगरच्या वतीने, पोलीस कल्याण सभागृहात मराठा महासंघातर्फे, बाबुपेठ येथे शिवसंकल्प सामजिक बहुउद्देशीय संस्थेतर्फे उत्सव आयोजित करण्यात आला. तर बल्लारपूर येथील रविंद्र नगर वॉर्ड येथील उत्सवात, चंद्रपूर येथील माता कन्नमवार चौकातील उत्सवात, दुर्गापूर पोलीस स्टेशनजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा अनावरण सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमांना आमदार मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच एमडीआर मॉल येथे रवीश सिंग यांच्यातर्फे आयोजित ‘छावा’ चित्रपटाच्या शोसाठी आमदार मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

७५० वर्षांपेक्षा जास्त गुलामगीरीचा इतिहास आपण बघितलाय. सर्वत्र अंधःकार होता. अशात १९ फेब्रुवारी १६३० ला शिवनेरीवर शिवाजी महाराजांचा जन्म झाला. त्यांच्यात सूर्यापेक्षाही जास्त पराक्रमाचे तेज होते. महाराजांनी ७५० वर्षांच्या गुलामगिरीची चिन्हं मिटवत भारतमातेच्या सुपुत्रात किती शक्ती असू शकते, हे दाखवून दिले. युक्ती, भक्ती आणि शक्ती याचा त्रिवेणी संगम छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये होता. जेव्हा गोठ्यातील गाय आणि घरातील माय मोघलांच्या आक्रमणात धोक्यात आली, तेव्हा हजारो सूर्यांचे तेज असणाऱ्या शिवबाचा जन्म झाला. तंजावर ते पेशावर छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानी तलवारीचे तेज दाखवून दिले. संघटन कौशल्य, नितीमत्ता, संकल्प या सर्वांवर त्यांचे प्रभूत्व होते, या शब्दांत आमदार मुनगंटीवार यांनी महाराजांची महती विषद केली.

Rajiv Pratap Rudy : चंद्रपूर हे भविष्यात भारतातील नामांकित पायलट प्रशिक्षण केंद्र बनेल

निर्धार आणि संकल्प हे महाराजांचे सर्वांत मोठे गुण होते. कितीही संकटे आली तरी छत्रपती कधीही डगमगले नाहीत, असंही ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नियोजन कौशल्याबद्दल ते म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे नियोजन आयआयएममध्ये शिकवले गेले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या नियोजनाच्या माध्यमातून जहाज, बोट, तोफखाने उभे केले. अफजलखानाचा सामना करताना त्यांनी नियोजनाचाच प्रभावी वापर केला.’ छत्रपती शिवाजी महाराजांचे नियोजन व्हिएतनाम सारखा देश शिकवतो, हे देखील त्यांनी प्रकर्षाने नमूद केले. तसेच जेएनयूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नियोजनाच्या अभ्यासासाठी निधी उपलब्ध करुन दिल्याचा त्यांनी उल्लेख केला.

राज्याचा सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून ३५०वा राज्याभिषेक दिन सोहळा आयोजित करण्याचे भाग्य लाभल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, ‘अफजलखानाचा कोथळा महाराजांनी कसा बाहेर काढला, हे शाळेतल्या शिक्षकांनी सांगितले होते. त्या कथा ऐकत-ऐकत मोठा झालो. अफजलखानाच्या कबरीवरील अतिक्रमण काढण्यासाठी २९ जुलै १९५३ पासून मागण्या, आंदोलन केले गेले. पण एकाही सरकारने ते काढले नाही. ते अतिक्रमण हटवण्याचं सौभाग्य चंद्रपूरचा सुपूत्र म्हणून मला लाभल्याचा आनंद आहे.

अफजलखान लाखो सैनिकांसह आला, आतंक पसरवत आला. पण महाराजांनी वाघनखांनी त्याचा कोथळा बाहेर काढला. ती वाघनखे लंडनच्या संग्रहालयातून भारतात आणण्याचे भाग्य मला लाभले. पहिल्यांदा वाखनखांचं दर्शन घेतलं तेव्हा प्रचंड ऊर्जा मिळाली, अशी भावना आमदार मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केली. भारत-पाकिस्तानच्या सीमेवर जेथे सर्जीकल स्ट्राईक झाला होता, तेथून ७ किलोमीटर अंतरावर सीमेवर १२ फुटांची महाराजांची प्रतिकृती उभी केली. पाकिस्तानच्या दिशेने तलवार धरून असलेला महाराजांचा पुतळा बघून अभिमानाने मान उंचावते.’

Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवार यांची कल्पना प्रत्यक्षात उतरली, जेएनयुमध्ये होणार छत्रपतींचा अभ्यास !

श्रीशैलम ते आग्रा..
श्रीशैलम येथे महाराजांनी तपश्चर्चा केली होती. तेथे सव्वातीन कोटी रुपये खर्च करून महाराजांचे ध्यान मंदिर उभारले. हेही सौभाग्य मिळाल्याचा आनंद आमदार मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. छञपती शिवाजी महाराजांचा जिथे औरंगजेबाने अपमान केला, त्या आग्र्यातही शिवजयंती साजरी होत असल्याचा मला अभिमान आहे, असेही ते म्हणाले.

दरवर्षी राज्याभिषेक दिन..
सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून आपण घेतलेल्या निर्णयामुळे दरवर्षी राज्यभिषेक दिन साजरा होणार आहे. महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांत जाणता राजा कार्यक्रम राबवले याचे समाधान आहे. १२ गडकिल्ल्यांना जागतिक दर्जा प्राप्त करून देण्यासाठी युनेस्कोला प्रस्ताव पाठवला असल्याचे आमदार मुनगंटीवार यांनी सांगितले. मानवतेची, अस्मितेच्या अभिमानाची, मातीच्या कणाकणांत ऊर्जा निर्माण करण्याची, गवताचंही पातं उचललं तर ते पातं दृष्टांना नष्ट करणारी तलवार बनवण्याची, ही शपथ प्रत्येक शिवभक्ताने घ्यावी, असेही आवाहन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

आमदार मुनगंटीवार यांचा अख्खा दिवस ‘शिवमय’..
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त चंद्रपूर येथील जनसंपर्क कार्यालयात शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आमदार मुनगंटीवार यांनी अभिवादन केले. भाजपा महानगर चंद्रपूरतर्फे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रमातही ते उपस्थित होते. सन्मित्र सैनिकी विद्यालय चंद्रपूर येथे आयोजित कार्यक्रमातही ते उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी परेडच्या माध्यमातून शिवरायांना मानवंदना दिली. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दुर्गापूर (जि. चंद्रपूर) येथे महाराजांच्या शिल्पाचे अनावरण आमदार मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. छत्रपतींचे हे शिल्प सर्वांना सूर्याप्रमाणे ऊर्जा आणि प्रेरणा देत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Sudhir Mungantiwar : शिवचरित्राचा प्रसार, मुनगंटीवारांचा अपार प्रयास !

संकल्प करण्याचा दिवस..
शिवजयंतीनिमित्त फडकवलेला भगवा म्हणजे फक्त कपड्याचा एक तुकडा नाही. तर ते आमचे अस्तित्व आहे. भगवा म्हणजे भयरहित, गर्वरहीत, वासनारहित समाज हे भगव्याचे वैशिष्ट्य आहे. आजचा दिवस म्हणजे महाराजांचे विचार ‘झोपडी से खोपडी तक’ पोहोचवण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे, असे ते म्हणाले.

महाराजांच्या गडकिल्ल्यांची नोंद..
महाराष्ट्र राज्याचा सांस्कृतिक कार्यमंत्री या नात्याने जगाने शिवाजी महाराजांची प्रेरणा घ्यावी, यासाठी यूनेस्कोकडे १२ गडकिल्ल्यांचा प्रस्ताव पाठविला आहे. या मानांकनाला निश्चितच जागतिक वारसा स्थळे म्हणून स्थान मिळेल आणि जगातील अनेक पर्यटक आपल्या राज्यात येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आपण आणि स्वत:चा परिवार एवढाच विचार करण्यापेक्षा समाजाप्रति विचार करण्याचे शिवतत्व अंगीकारण्याचे आवाहनही त्यांनी केले. समाजाला चांगले करण्याची इच्छा अंतर्मनात निर्माण केली तर २०४७ हा विकसीत भारताचा प्रगतशील शताब्दी महोत्सव असेल, असा विश्वास व्यक्त करीत त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले.