Breaking

Solar Scam : सोलर घोटाळा प्रकरणात नगराध्यक्षांवर फसवणुकीचा गुन्हा

Municipal council chairman charged with fraud : प्रशासनासह राजकीय वर्तुळात खळबळ; स्वीकृत सदस्यावरही कारवाई

Buldhana मोताळा नगरपंचायतीच्या सोलर प्लांट ना-हरकत घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई झाली आहे. खोटे दस्तऐवज तयार करून शासनाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी नगराध्यक्ष माधुरी देशमुख, स्वीकृत सदस्य अमोल देशमुख, व तीन कर्मचाऱ्यांसह पाच जणांविरोधात बोराखेडी पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

सोलर प्रकल्पासाठी आवश्यक असलेली ना-हरकत नगरपंचायतीकडून घेण्यात आली नसून, त्यावर मुख्याधिकाऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करण्यात आल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे ही तक्रार खुद्द नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांनीच केली आहे.

Maharashtra Assembly Session : ‘होय, त्रिभाषा सूत्र आम्हीच स्वीकारलं, कम ऑन किल मी’

याप्रकरणी चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. नगराध्यक्षा माधुरी देशमुख यांनी प्रारंभी या कागदपत्रांवरील सही नाकारली होती. मात्र, नंतर नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत ही सही ‘नजरचुकीने’ झाल्याचे नमूद करून आपण माघार घेतल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे त्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी सहा नगरसेवकांनी पोलिसांकडे केली होती. नगरपंचायतीत या संदर्भातील ठरावही संमत करण्यात आला होता. यानंतर झालेल्या प्राथमिक चौकशीत मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस आला.

२९ जून रोजी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात आरोपींनी संगनमत करून बनावट ना-हरकत प्रमाणपत्र व ठराव तयार करून सन पॉवर इंडिया वेंचर्स प्रा. लि. कंपनीला दिल्याचे निष्पन्न झाले. यामुळे सुमारे १० लाख रुपयांहून अधिक शासकीय महसूल – नगर कर, विकास कर, बांधकाम परवाना शुल्क, वृक्षतोड शुल्क – बुडवण्यात आल्याचे चौकशीत नमूद आहे. गुन्हा क्रमांक 283/2025 भादंवि कलम 420, 467, 468, 34 अन्वये नोंदवण्यात आला आहे. आरोपींची चौकशी सुरू आहे.

Sanjay Raut : लुटारू सरकारला रोज चाबकाचे फटके मारावेत, असा यांचा कारभार !

या घोटाळ्यात उपविभागीय कार्यालयाकडूनही प्रकल्पास ना-हरकत देण्यात आल्याने त्यांची भूमिका सुद्धा संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी जिल्हाधिकारी स्तरावर व्हावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे. नगराध्यक्षांवर गुन्हा दाखल झाल्याने मोताळा नगरपंचायतीतील सत्ताधाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. आगामी राजकीय समीकरणांवर या प्रकरणाचा मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.