Demand for action against Dean of Nagpur Agricultural College of PDKV : मुख्यमंत्र्यांकडे तक्रार होऊनही कारवाई नाही; हकालपट्टीची मागणी
Nagpur : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गत असलेल्या नागपूर कृषी महाविद्यालयातील एका जबाबदार पदावरील प्राध्यापकाने महिला, मुलींबाबत अपमानजनक वक्तव्य केल्यामुळे उपराजधानीत संतापाची लाट उसळली आहे. डॉ. विलास अतकरे असे या महाशयांचे नाव आहे. यांच्याकडे ऑक्टोबर २०२४ पासून नागपूरच्या कृषी महाविद्यालयाच्या सहयोगी अधीष्ठाता म्हणजे प्राचार्यपदाचा प्रभार होता. ते डेअरी विभागाचे प्राध्यापक आहेत. महाविद्यालयाच्या गॅदरींगमध्ये महिला व मुली उपस्थित असताना डॉ. अतकरे यांनी त्यांच्याचबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्यामुळे त्यांच्या हकालपट्टीची मागणी होत आहे.
राज्यात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. सातत्याने विरोधक सत्ताधाऱ्यांना यासाठी धारेवर धरत आहेत. अशात मुख्यमंत्र्यांच्या शहरात अनेक तक्रारी असलेले डॉ. अतकरेंसारखे लोक प्राचार्यांसारख्या जबाबदार पदांवर कसे बसतात, असा प्रश्न नागपूर कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनींसह सर्वांनाच पडला आहे. गॅदरींगमध्ये मुलींबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्यानंतर महाविद्यालयातील काही महिला त्यांना जाब विचारायला गेल्या होत्या. त्यावेळी ‘मी तुमच्या मुलीबद्दल बोललो नाही’, असे उत्तर त्यांनी दिले होते. पण ज्यांच्याबद्दल ते अपमानजनक बोलले होते, ‘त्याही कुणाच्या तरी मुली आहेतच ना. विद्यार्थिनींबद्दल असे बोलणे सर्वार्थाने चुकीचे आहे’, असे त्या तक्रारकर्त्यां महिला अतकरेंना म्हणाल्या. त्यावर त्यांनी पुन्हा महिलांचा अपमान केला.
Hindi Marathi Conspiracy : उद्धव ठाकरेंनी हिंदी सक्तीचा अहवाल का स्वीकारला ?
अद्याप चौकशी नाही..
नागपूर कृषी महाविद्यालयाच्या मार्च २०२५ मध्ये झालेल्या स्नेहसंमेलनात डॉ. अतकरेंनी उपरोक्त वक्तव्य केले होते. याशिवायही काही घाणेरड्या गोष्टी डॉ. अतकरे बोलले आहेत, असेही महिलांनी सांगितले. महिलांनी तक्रारी केल्यानंतर विद्यापीठाने दखल घेत डॉ. अतकरेंची बदली केली. बदलीने ते चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथील महाविद्यालयात ते रुजू झालेले आहेत. पण इतक्या तक्रारी होऊनसुद्धा प्रशासनाने त्या प्रकरणांची साधी चौकशीही केली नाही, याबद्दल तक्रारकर्त्यां महिलांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
Ravikant Tupkar : बैल नाही म्हणून औत ओढणाऱ्या वृद्ध शेतकऱ्याला ‘क्रांतिकारी’चा आधार!
मुख्यमंत्र्यांकडेही झाली तक्रार..
डॉ. विलास अतकरे यांच्या अशा बेताल वागण्याच्या अनेक तक्रारी झाल्या. महिला व मुलींबाबत सतत अपमानजनक बोलणाऱ्या, वागणाऱ्या या प्राध्यापकाने शासकीय शिष्टाचाराचे उल्लंघन केल्याचाही प्रकार घडलेला आहे. या प्रकाराची तक्रार शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघ प्रभारी नितीन सोनटक्के यांनी मुख्यमंत्र्यांकडे एप्रिल २०२५ मध्ये केली. यानंतर अतकरेंवर कारवाई होण्याची अपेक्षा होती. पण तरीही कारवाई झालेली नाही. अतकरेसारख्या बेताल माणसाची हकालपट्टी करण्याची मागणी संतप्त महिलांनी केली आहे.