Unemployed people cheated by claiming to be Shiv Sena leaders : डब्ल्यूसीएलमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष; पोलिसांत गुन्हा दाखल
Akola ‘वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड’ (WCL) मध्ये नोकरी मिळवून देतो, या आमिषाने अकोला आणि परिसरातील २५ बेरोजगार तरुण-तरुणींना तब्बल दहा-दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात एकूण अडीच कोटी रुपयांची लुबाडणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याच्या नावाने ही फसवणूक केली असल्याचे समोर आले आहे.
या फसवणुकीत नागपूरचा वासुदेव हालमारे आणि अकोल्याचा आशुतोष चंगोईवाला या दोन मध्यस्थ दलालांचा मुख्य सहभाग आहे. यांच्यामार्फत नोकरीसाठी प्रत्येकी २० लाख रुपयांचा सौदा ठरवण्यात आला होता. त्यापैकी प्रत्येकाकडून दहा लाख रुपये आधीच उकळण्यात आले.
High Court Nagpur Bench : फडणवीस, मुनगंटीवारांसह पाच आमदारांना हायकोर्टाचा दिलासा!
या उमेदवारांना नागपूर येथे नेऊन बनावट अधिकाऱ्यांची भेट घालून दिली गेली. मात्र आठ महिने उलटल्यानंतरही नोकरी मिळाली नसल्याने फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. पैसे मागितल्यावर दलाल आशुतोष चंगोईवाला शिंदे गटाचे उपनेते आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या नावाने धमक्या देत आहे, असा आरोप पीडितांनी केला आहे.
Gopichand Padalkar : उद्धव ठाकरे सूर्याजी पिसाळाची औलाद… भाजप आमदाराची जीभ घसरली
या प्रकरणी अकोल्यातील सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात वासुदेव हालमारे, आशुतोष चंगोईवाला आणि त्याच्या कुटुंबातील दोन जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “आशुतोष चंगोईवालाला मी ओळखतो खरे, पण गेल्या पाच वर्षांपासून त्याच्याशी काहीही संपर्क नाही. वासुदेव हालमारे याला मी ओळखतही नाही. संबंधितांनी फसवणूक केली असेल, तर त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर ‘WCL’मध्ये नोकरीच्या नावाखाली राज्यभरात एक मोठं रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.