Ministerial post doors closed for Dhananjay Munde, MLA post in danger : मंत्रिमंडळातून काढण्याचे दुसरे मोठे कारण म्हणजे करुणा शर्मा
Nagpur : कितीही प्रकरणे झाली, आरोप झाले तरी वातावरण निवळल्यावर मंत्रिपद परत मिळेल, अशी आशा राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते धनंजय मुंडे यांना होती. पण आज (२० मे) राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अन् धनंजय मुंडे यांच्या कमबॅकच्या सर्व आशा मावळ्यल्या. येवढेच काय पण त्यांच्या आमदारकीवरही टांगती तलवार असल्याची परिस्थिती सध्यातरी दिसते आहे.
राज्याच्या मंत्रिमंडळात निवडून आलेल्या सदस्यांच्या संख्याबळानुसार खातेवाटप झालेले आहे. यामध्ये सर्वात मोठा पक्ष भाजपचे १९ मंत्री, शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे ११ तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे ९ मंत्री आहेत. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेले मंत्रिपद आज छगन भुजबळ यांना देण्यात आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा कोटा पूर्ण झाला. परिणामी धनंजय मुंडे यांची मंत्रीमंडळात वापसी होणे अशक्य आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येशी संबंधित वाल्मिक कराड याच्याशी धनंजय मुंडेंचे निकटचे संबंध होते. त्यामुळे शपथविधीच्या वेळीच त्यांना मंत्रिपद देऊ नये, असा सूर विरोधकांकडून आवळण्यात आला होता. परंतु हा विरोध झुगारून त्यांना मंत्रीपद देण्यात आले. नंतर त्यांच्यावर चौफेर टीका होऊ लागली आणि पक्षप्रमुख अजित पवार यांच्यावरही दबाव वाढला. त्यामुळे वैद्यकिय कारण पुढे करत मुंडेंनी राजीनामा दिला. आतापर्यंत त्यांचे खाते अजित पवार सांभाळत होते.
धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढण्याचे दुसरे मोठे कारण म्हणजे करुणा शर्मा. करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडेंची पत्नी असल्याचा दावा करणारी याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात मुंबई – माझगाव सत्र न्यायालयाने धनंजय मुंडे यांना दोन लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश दिलेले आहेत. मुंडे यांनी मुलांचा सांभाळ करण्याची तयारी दर्शवली. परंतु करुणा यांना पत्नीचा दर्जा देण्यास नकार दिला होता. हा खटला जिंकल्यानंतर करुणा शर्मा अधिक आक्रमक झाल्या. त्यामुळे धनंजय मुंडे यांची आमदारकीही जाण्याचा धोका वाढला आहे.
तिसरे मोठे कारण म्हणजे धनंजय मुंडे यांच्यामुळे पक्षासोबतच सरकारचीही प्रतिमा मलिन झाली. त्यामुळे पक्षाकडून त्यांना पुन्हा संधी मिळणार नाही, अशी चर्चा राष्ट्रवादीत दबक्या आवाजात सुरू आहे. एकंदरीतच काय तर धनंजय मुंडे यांचे राजकीय भवितव्य अधांतली लटकलेले दिसत आहे. पण एके काळी छगन भुजबळ यांच्याही राजकीय कारकिर्दीला अशीच घरघर लागली होती. ते आता राजकारणात पुन्हा येऊ शकणार नाहीत, हे विधान जवळपास पक्के झाले होते. त्यानंतरही ते तेवढ्याच ताकदीने परत आले अन् मंत्रीही झाले. राजकारण आणि क्रिकेट यामध्ये अगदी शेवटच्या क्षणापर्यंत काय होईल, हे सांगता येत नाही. तसेच धनंजय मुंडे यांचे पुढील काळात कमबॅक झाले अन ते पुन्हा मंत्री झाले, तर आश्चर्य वाटू नये.