Need to establish ‘Millett Board’ in agricultural universities : खरीपपूर्व शेतकरी मेळावा, 1400 शेतकऱ्यांचा सहभाग, 1.70 कोटींच्या बियाण्यांची विक्री
Akola राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये ‘मिलेट बोर्ड’ स्थापन करून भरड धान्य पिकाखालील क्षेत्र वाढवणे काळाची गरज असल्याचे मत आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात झालेल्या खरीपपूर्व शेतकरी मेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
सावरकर म्हणाले, “बिहारमधील मखाना बोर्डच्या धर्तीवर महाराष्ट्रात ‘मिलेट बोर्ड’ स्थापन झाले पाहिजे. १७ प्रकारच्या भरड धान्यांना किमान आधारभूत किंमतीची शाश्वती दिल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकते. बीटी कपाशीच्या संतुलित वापरासोबतच शेतमाल विक्रीसाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सचोटीने काम केले पाहिजे. पारंपरिक शेती पद्धतीस आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक आहे.”
कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, “शाश्वत शेतीसाठी आंतरपिकांची निवड, पिक फेरपालट, पशुधनाचा सहभाग व सेंद्रिय खतांचा वापर महत्त्वाचा आहे. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कपाशी, सोयाबीनसह भरडधान्य पिकांची योग्य योजना करून नुकसान टाळता येते.”
या मेळाव्यात विद्यापीठ निर्मित सुमारे 2000 क्विंटल बियाण्यांची विक्री झाली, ज्यात सोयाबीन (500 क्विंटल), धान (750 क्विंटल), हळद बेणे (600 क्विंटल) यांचा प्रमुख समावेश होता. एकूण 1 कोटी 70 लाख रुपयांची बियाणे व कृषी निविष्ठा विक्री झाली.
मेळाव्यात विविध शास्त्रज्ञांनी खरीप हंगामासाठी उपयुक्त मार्गदर्शन केले. डॉ. अरविंद तुपे, डॉ. प्रविण राठोड, डॉ. सतिश निचळ, डॉ. संजय काकडे, डॉ. एकनाथ वैद्य आदींनी हवामान अंदाज, किड व्यवस्थापन, पीक लागवड तंत्र या विषयांवर सादरीकरण केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना थेट उत्तरे देण्यात आली.