Congress protest in Akola : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
Akola काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पाठवलेल्या नोटिशींविरोधात गुरुवारी अकोल्यात काँग्रेसने आक्रमक आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
भाजप सरकारने गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय सूडबुद्धीने या नोटिशा पाठवल्याचा आरोप काँग्रेसने केला. हे कृत्य हुकूमशाहीवृत्तीचे असून, अशा दबाव तंत्राला काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून प्रत्युत्तर देईल, असा इशारा आंदोलकांनी दिला.
या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) अशोक अमानकर, महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. प्रशांत वानखडे, माजी मंत्री डॉ. अझहर हुसेन, प्रकाश तायडे, महेंद्र गवई, आकाश कवडे यांच्यासह युवक काँग्रेस, महिला काँग्रेस आणि विविध पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. आंदोलनादरम्यान केंद्र सरकारविरोधात घोषणांचा जोर वाढत गेला. ‘सोनिया-राहुल यांना हात लावल्यास कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही’, असा इशारा यावेळी देण्यात आला.
काँग्रेस नेत्यांनी सांगितले की, सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे देशाच्या संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी लढत आहेत. केंद्र सरकार विरोधी आवाज दाबण्यासाठीच त्यांना लक्ष्य केले जात आहे. मात्र, काँग्रेस पक्ष मागे हटणार नसून रस्त्यावर उतरून लढा देईल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
Local Body Elections : कुणाची संधी हुकली; काहींना पुन्हा लॉटरी!
देशभर काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून, हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. केंद्र सरकारच्या या कारवायांना विरोध करत काँग्रेसने आगामी काळात मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभारण्याचा निर्धार व्यक्त केला.