Raj Thackerays direct question to office bearers ; राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना थेट सवाल
Mumbai : 20 वर्षांनी आम्ही दोन भाऊ एकत्र येऊ शकतो, तर मग तुम्ही एकमेकांमध्ये वाद का घालता? असा थेट सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना विचारला आहे. मुंबईत पार पडलेल्या आढावा बैठकीत राज ठाकरे यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना एकजूट आणि निवडणूक तयारीचे स्पष्ट संकेत दिले.
या बैठकीत बोलताना राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांमध्ये वाद नको, एकमेकांना बरोबर घेऊन चालायचं आहे, असा स्पष्ट संदेश दिला. निवडणूक जवळ आली आहे, योग्य वेळी योग्य सूचना दिल्या जातील. मात्र आतापासूनच मतदार यादीवर काम सुरू करा,अशी सूचना त्यांनी दिली. जुने कार्यकर्ते, दूर गेलेले पदाधिकारी आणि नवे चेहरे यांना सोबत घेऊन मैदानात उतरा असा संदेश त्यांनी दिला.
मतदारयादीच्या अनुषंगाने त्यांनी म्हटलं, मतदार यादी तपासा, योग्य मतदारांची नोंदणी झालेली आहे ना हे पाहा. एकेका मताचा मोठा परिणाम होतो. राज ठाकरे यांच्या या थेट आणि स्पष्ट भाषणामुळे उपस्थित पदाधिकाऱ्यांमध्ये नवचैतन्य आलं अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
Political events : राजकीय वातावरण तापले ‘सप्टेंबरमध्ये मोठा स्फोट’ !
या मेळाव्यानंतर प्रतिक्रिया देताना मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले, “राजसाहेबांनी दिलेला संदेश आधीपासूनच कार्यकर्त्यांना माहीत होता. पण त्यांनी आज पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे की, आमच्यासारखे भाऊ २० वर्षांनी एकत्र येऊ शकतात, तर कार्यकर्ते एकत्र का येऊ शकत नाहीत?” मुंबई महापालिकेत सत्ता येणारच, असा आत्मविश्वासही राज ठाकरेंनी यावेळी बोलून दाखवला. “मी हे टाळ्यांसाठी सांगत नाही, मुंबईमध्ये आपली ताकद मोठी आहे. ती पुन्हा सिद्ध करायची वेळ आली आहे,” असं ते म्हणाले.
मराठी भाषेच्या मुद्द्यावरूनही त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिशा दिली. “कोणालाही विनाकारण मारू नका, आधी समजावून सांगा. समजून घेणारा असेल तर त्याला शिकवा. पण जर कोणी उर्मटपणे वागत असेल, तर त्याच्या लायकीप्रमाणे उत्तर द्या. मात्र या सर्व घटनांचे व्हिडिओ काढू नका, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.मनसेच्या या बैठकीनंतर मुंबई महापालिकेच्या राजकारणात पक्ष पुन्हा एकदा आक्रमकपणे उतरण्याच्या तयारीत असल्याचे संकेत स्पष्ट दिसत आहेत.
_______